Samarjeet Ghatge rejoining BJP: कोल्हापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सामील झालेले समरजितसिंह घाटगे पुन्हा एकदा भाजपमध्ये परतणार आहेत. येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा ‘घरवापसी’ सोहळा पार पडणार आहे.
मूळ पक्षात परतल्याचा अभिमान: घाटगे
या निर्णयाबाबत बोलताना समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले की, “माझा भाजप प्रवेश गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित होता. जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत, त्यामुळे पक्षप्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. आता पुन्हा मूळ पक्षात परतत असल्याचा मला सार्थ अभिमान आणि समाधान आहे.”
शरद पवारांना भेटूनच घेतला निर्णय
घाटगे यांनी पुढे सांगितले की, त्यांनी डिसेंबर महिन्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांना पूर्वकल्पना देऊनच आपण पुढचे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या थोरल्या भावासारखे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा काम करण्याची संधी मिळत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
राजकीय पार्श्वभूमी आणि कागलमधील समीकरणे
राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्याचे वंशज आणि उच्चशिक्षित (CA) असलेले समरजितसिंह घाटगे यांचे सहकार क्षेत्रावर मोठे वर्चस्व आहे. शाहू साखर कारखाना आणि राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या माध्यमातून त्यांनी मोठी संघटना उभी केली आहे. नुकत्याच झालेल्या कागल नगरपालिका निवडणुकीत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी हातमिळवणी करत 23 पैकी 23 जागा जिंकून इतिहास रचला होता.
समरजितसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हे देखील वाचा –










