Baramati : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आज अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्याआधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी पाठिंब्यासाठी फोनवरून संपर्क साधला होता. काल त्यांनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फोन केला होता. मात्र, काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्याने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. उद्या या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
काँग्रेसने बारामतीमध्ये आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन धनगर कार्ड वापरले आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेसने धनगर समाजाचा उमेदवार दिल्याने हे सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान असेल. आज ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांनीही या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. ते निवडणुकीत उतरले तर हे आव्हान आणखी कठीण होऊ शकते. काँग्रेसने ही घोषणा केल्यानंतर अजूनही याबाबत निर्णय उबाठा काय ठरवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरल्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न महायुतीकडून सुरुवातीपासून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, विरोधी महाविकास आघाडीत ही निवडणूक लढण्यावरून मतभेद होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या उबाठाचे अजून यासंदर्भात काही ठरलेले नाही, असे खा. संजय राऊत यांनी आज सांगितले. मात्र, काल सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्यानंतर उबाठा या निवडणुकीत आपला उमेदवार न उतरवण्याची शक्यता आहे. काँग्रेसने सुरुवातीपासून ही निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका घेतली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. यावरून मविआत अनेक दिवस खल झाल्यावर अखेरीस आज संध्याकाळी काँग्रेसने आकाश मोरे यांच्या नावाची घोषणा केली. त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याचे वृत्त थडकले. सुनेत्रा पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात फोनवर नेमके काय बोलणे झाले, याचा तपशील उघड झाला नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या फोननंतरही काँग्रेसच्या भूमिकेत बदल झाला नाही.
अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अजूनही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले की, बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा ही निवडणूक राजकारण करण्याची बाब नाही. ती बिनविरोध व्हावी अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे गरज पडली तर आम्ही राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचीदेखील भेट घेऊ. कारण असे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात.
दुसरीकडे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा अजूनही सुरू असली तरी आतापर्यंत 19 उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. त्यामध्ये हिंदुस्तान जनता पार्टीचे सतीश कदम, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे राघू घटुकडे, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अरुण निटुरे यांच्यासह सागर भिसे, गजानन गवळी, त्रिशाला कांबळे, दिलीप अळोणी, दत्तात्रेय बेदरे, मिथून आटोळे, रजाक मुलाणी, संदीप खरात, विलास होळकर, अभिजीत बिचुकले, अनिल तुपे, संकेत गावडे, दादा थोरात आणि अभिजीत कांबळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख 9 एप्रिल आहे. हे उमेदवार अर्ज मागे घेतात का, याकडेही लक्ष असेल.
राहुरीबाबतही मतभेद
बारामतीबरोबर राहुरी मतदारसंघातही पोटनिवडणूक होत असून ती लढण्यावरूनही मविआत मतभेद असल्याचे उघड झाले आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी, उबाठा आणि काँग्रेस या मविआतील तिन्ही पक्षात निवडणूक लढवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने दिवंगत आमदार शिवाजी कार्डिले यांचे पुत्र अक्षय कार्डिले यांना उमेदवारी दिली आहे.
मागील निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात राहुरी विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे होती. त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीच्या ’तुतारी वाजवणारा माणूस’ पक्षचिन्हावर निवडणूक लढवली होती. परंतु आता तनपुरे शरद पवार यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. इथे काँग्रेसनेही उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. तर शिवसेना उबाठानेदेखील निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. आज सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, राहुरीच्या बाबतीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ.











