Artemis : अमेरिकेची अंतराळ संस्था नासा सध्या राबवत असलेली आर्टेमिस-2 मोहीम आता चंद्राच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. या मोहिमेने आतापर्यंत प्रवासातील अर्ध्याहून अधिक अंतर पूर्ण केले आहे. यादरम्यान अंतराळवीरांनी टिपलेली चंद्र आणि पृथ्वीची आश्चर्यकारक आणि अद्भुत नवी छायाचित्रे नासाने पोस्ट केली आहेत.

या छायाचित्रांमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रावरील ओरिएंटेल खोरे (ओरिएंटेल बेसिन) या भागाचे प्रथमच मानवी डोळ्यांनी दर्शन झाले. सुमारे 965 किलोमीटर रुंद असलेले हे प्रचंड विवर चंद्राच्या जवळच्या आणि दूरच्या भागांमधील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. यापूर्वी हा भाग केवळ यांत्रिक साधनांच्या मदतीनेच पाहिला गेला होता. या मोहिमेतून मिळालेल्या छायाचित्रांमध्ये केवळ चंद्रच नव्हे, तर पृथ्वीचेही अप्रतिम दृश्य दिसते. अंतराळातून दिसणारी पृथ्वी निळ्या प्रकाशात उजळलेली दिसते. अपोलो मोहिमेनंतर इतक्या दूरून पृथ्वीचे असे दर्शन पुन्हा एकदा मानवाला घडले.

या मोहिमेत वापरले जात असलेले ओरियन स्पेसक्राफ्ट हे अंतराळयान म्हणजे जणू अंतराळातील एक छोटेसे घरच आहे. या यानातून अंतराळवीर केवळ चंद्राकडे प्रवास करत नाहीत, तर त्यांच्या दैनंदिन आयुष्याची झलकही जगासमोर येते. खिडक्यांमधून दिसणारा चंद्र जसजसा जवळ येत आहे, तसा तो अधिक मोठा आणि भव्य दिसत आहे. अंतराळवीरांच्या मते, आता चंद्र अगदी हाकेच्या अंतरावर असल्यासारखा भासतो आहे. अंतराळयानातील प्रकाश कमी ठेवून बाहेरील दृश्य अधिक स्पष्ट दिसावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या वेळी कॅनडाचे अंतराळवीर जेरेमी हॅनसेन खिडकीतून बाहेर पाहत चंद्राचे सौंदर्य अनुभवताना दिसले.












