Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादीकडून आपला अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त करताना त्या भावूक झाल्या. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, बारामती हा अजित पवारांचा श्वास होता. त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीतील प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळा, इमारतीत त्यांचा स्पर्श आहे. आज या सर्व गोष्टी त्यांच्या आठवणीने रडत आहेत. तर मी स्वतः माझे दुःख तळघरात कोंडून अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले आहे. जशी दादांना साथ दिलीत, त्यापेक्षाही काकणभर अधिक साथ मला द्या.
सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार अॅड. आकाश मोरे यांनी अर्ज भरल्याने बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, असे चित्र आहे. मात्र अजून अर्ज माघारी घेण्याची मुदत असल्याने येत्या काही दिवसांत घडामोडी कोणत्या घडतात याकडे
लक्ष आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्याआधी आज बारामतीत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर लावलेल्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो होते. शिवाय खासदार शरद पवार यांचाही फोटो झळकत होता. नंतर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत आपला फोटो वापरणे चुकीचे असल्याचे म्हटले.
ते म्हणाले की, अजितदादांच्या जाण्याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला मोठे दुःख झाले आहे. त्यांच्याबद्दल मनात आदर आहे, हे मान्यच करावे लागेल. सध्या पवार कुटुंबात कुटुंबप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही बारामतीची ही पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही या निवडणुकीत कोणाचाही प्रचार करणार नाही. अमित शहा आणि मोदींचा फोटो असणे गैर नाही. कारण तो त्यांचा मित्रपक्ष आहे, पण माझा फोटो बॅनरवर घेणे चुकीचे आहे.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, मविआतील घटक पक्ष म्हणून काँग्रेसला माघार घेण्याबाबत सांगण्याची आम्हाला गरज वाटत नाही. राजकारणात पराभव झाला तरी लोक लोकांची कामे करण्यासाठीच मैदानात उतरत असतात. तर बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यावरून राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. याबाबत शरद पवार म्हणाले की, राजकारणामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागले. राजकारणातील परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही.
आज सकाळी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार सर्वप्रथम काटेवाडी येथून कन्हेरी हनुमान मंदिरात गेल्या. या मंदिरात त्यांनी पूजा केली. त्यानंतर त्यांनी बारामतीतील शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तिथून त्यांनी अजित पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. स्मृतिस्थळाकडे जाताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर मोरोपंत नाट्यगृहात मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रफुल्ल पटेल, तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस आज तामिळनाडू प्रचार दौर्यावर असल्याने ते उपस्थित नव्हते. या मेळाव्यात भाषण करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी आपले लाडके नेते आदरणीय दादांना गमावले. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. मी आज अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटले नव्हते की, बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा आपल्यात नाहीत, असे मला अजूनही वाटत नाही. मला ते मान्यही नाही, पण नियतीने हा काळ माझ्यावर व तुमच्यावर आणला आहे.
दादांचे जाणे ही केवळ माझी व माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र व देशाचीही हानी झाली आहे. दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा हाच दादांचा विश्वास आणि आधार होता. गेल्या 35-36 वर्षांत तुम्ही सर्वांनी अजित पवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत, या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत होता. त्यामुळेच दादांनी प्रत्येक वेळी आपल्या स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडीत काढले. तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे, म्हणून मी 24 तास काम करतो असे दादा नेहमी म्हणायचे. दादांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही. तर दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला संधी आहे.
आदरणीय पवार साहेबांनी बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला. दादांनी त्यावर आपल्या कष्टांनी रंग भरले. बारामतीला फुलवले, जगवले आणि जागतिक दर्जाकडे नेले. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, हे बारामतीकरांना मी यापुढेही वचन देते. बारामती तालुका हा जगातील सर्वात विकसित सर्वात प्रगत तालुका बनवेन, हे दादांचे स्वप्न नव्हते, तर ही दादांची जिद्द होती. एक ध्यास होता. दादांना बारामती एक जागतिक दर्जाचे शहर बनवायचे होते. हे स्वप्न पूर्ण होणार असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेले. जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहीन, हे शब्द त्यांनी खरे केले. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. दादा शब्दाला जागणारे होते दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते की, माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझे कुटुंब नाही. तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन, हा शब्द माझाही आहे. दादांच्या अचानक जाण्याने अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचले, पण काळजी करू नका. एकाही कार्यकर्त्याला वार्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढे हे तसाच सुरू राहील. बारामतीचा विकास पूर्वीसारखाच वेगाने सुरू राहील. कोणत्याही विकासकामाची गती व गुणवत्ता यापुढे कमी होऊ देणार नाही. तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहाल. तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास कधीही फोल ठरू देणार नाही.
दरम्यान, बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष निवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस पक्ष निवडणूक लढवेल अशी भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. त्यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर व वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खा. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा केली होती. दोन्ही पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यानुसार अॅड. आकाश मोरे यांनी आज काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मोरे हे व्यवसायाने वकील असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. त्यांचे वडील विजयराव मोरे हे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे
आमदार होते.
तटकरे-पटेल घातकी! बारामतीत बॅनरची चर्चा
सुनेत्रा पवार अर्ज भरत असतानाच बारामती शहरातील प्रशासकीय भवन परिसरात लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले. या बॅनरवर, अजितदादांचे फक्त नावच पुरेसे आहे, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही – समस्त दादा प्रेमी, असे लिहिले होते. हा बॅनर कुणी लावला होता, हे कळले नाही. परंतु चर्चा सुरू झाल्यावर तो लगेच उतवण्यात आला. या बॅनरमधील घातकी या शब्दप्रयोगामुळे बारामतीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अजित पवार समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे संकेत मिळत आहेत.











