Trump Iran War Threat: मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अमेरिकेने दिलेला ४५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने अधिकृतपणे फेटाळला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणने आपले उत्तर अमेरिकेला पाठवले असून, केवळ तात्पुरती शांतता आम्हाला मान्य नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कमालीचे संतापले असून त्यांनी इराणला नकाशावरून पुसून टाकण्याची धमकी दिली आहे.
इराणची १० कलमी नियमावली: अटी काय आहेत?
इराणने केवळ युद्धविराम नाकारला नाही, तर १० मुद्द्यांचा एक आराखडा समोर ठेवला आहे. इराणच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
- केवळ इराणमध्येच नाही, तर लेबनॉन आणि गाझामध्येही युद्ध कायमस्वरूपी थांबवावे.
- पुन्हा हल्ला होणार नाही, याची लेखी हमी द्यावी.
- ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ इराणच्या नियंत्रणाखाली असल्याचे मान्य करून तेथून जाणाऱ्या जहाजांकडून कर वसूल करण्याचा अधिकार द्यावा.
- सर्व आर्थिक निर्बंध तातडीने उठवावेत आणि अणुऊर्जेचा अधिकार मान्य करावा.
- युद्धामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी.
ट्रम्प यांचा ‘एका रात्रीचा’ अल्टिमेटम
इराणच्या या भूमिकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना आक्रमक पवित्रा घेतला. “संपूर्ण इराण एका रात्रीत संपवला जाऊ शकतो आणि ती रात्र असू शकते,” असे खळबळजनक विधान ट्रम्प यांनी केले आहे. इराणला अणुवस्त्रे कधीही मिळू देणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, इराणचा सध्या विनाश होत आहे, म्हणून ते अशा अटी घालत आहेत. मात्र, युद्धविराम कधी करायचा हे फक्त मीच ठरवेन आणि मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.
मध्यस्थीचे प्रयत्न अपयशी?
पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की हे देश गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात संदेशांची देवाणघेवाण सुरू आहे. मात्र, इराणने प्रस्ताव फेटाळल्यामुळे ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) सुरूच राहील, असे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत. जर मंगळवार रात्रीपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही, तर इराणच्या पायाभूत सुविधांवर भीषण बॉम्बफेक होण्याची दाट शक्यता आहे.









