Donald Trump On Iran War : मध्य पूर्वेतील तणाव आता एका निर्णायक आणि भयावह वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज ३९ वा दिवस असून, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट अण्वस्त्र युद्धाची गर्भित धमकी दिली आहे. “अमेरिकेने ठरवले तर इराणला अवघ्या चार तासांत किंवा एका रात्रीत बेचिराख केले जाऊ शकते आणि ही कारवाई आज रात्रीही शक्य आहे,” अशा जहाल शब्दांत ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे.
या धमकीनंतर अमेरिकेच्या सामर्थ्याचे प्रतीक मानले जाणारे आणि अणू युद्धाच्या वेळी विशेष कमांड अँड कंट्रोलसाठी वापरले जाणारे ‘ई-४ बी नाईटवॉच’ (E-4B Nightwatch), ज्याला ‘डूम्सडे प्लेन’ असेही संबोधले जाते, ते नेब्रास्का येथील ओमाहा हवाई तळावर घिरट्या घालताना दिसून आले आहे. बोईंग कंपनीने तयार केलेले हे विमान आकाशातून युद्धाचे संचालन करण्यास सक्षम असल्याने जगावर अणू युद्धाचे सावट गडद झाले आहे.
या युद्धाची पार्श्वभूमी इराणचा सातत्याने विस्तारत असलेला अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांमध्ये दडली आहे. २०२५ च्या सुरुवातीपासूनच इस्रायलने इराणला वारंवार इशारा दिला होता की, त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अण्वस्त्र हालचाली खपवून घेतल्या जाणार नाहीत. मात्र, इराणने या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आपला कार्यक्रम सुरूच ठेवला. परिणामी, इस्रायल आणि अमेरिकेने थेट इराणची राजधानी तेहरानवर हल्ले चढवल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या पराक्रमाचे कौतुक करतानाच स्पष्ट केले की, हे युद्ध सध्या अमेरिकेच्या धोरणानुसार लढले जात असून, कमीत कमी वेळात इराणचे अपरिमित नुकसान करण्याची क्षमता अमेरिकेकडे आहे.
दुसरीकडे, इराणने अमेरिकेच्या या इशाऱ्यांची स्पष्टपणे खिल्ली उडवली आहे. “अमेरिकेच्या अशा पोकळ धमक्यांना आमच्या देशातील लहान मुलेदेखील घाबरत नाहीत,” अशा शब्दांत इराणने ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले असून, त्यांनी अमेरिकेला ‘आजची रात्र’ पाहण्याचे खुले आव्हान दिले आहे.











