Home / क्रीडा / IPL 2026 : MI आणि CSK साठी ‘करो या मरो’! सलग ३ पराभवांनंतर मुंबई-चेन्नईचं गणित बिघडलं; पाहा कसं आहे प्ले-ऑफचं चक्रव्यूह…

IPL 2026 : MI आणि CSK साठी ‘करो या मरो’! सलग ३ पराभवांनंतर मुंबई-चेन्नईचं गणित बिघडलं; पाहा कसं आहे प्ले-ऑफचं चक्रव्यूह…

IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून पहिल्या २० सामन्यांनंतर गुणतालिकेतील चढाओढ...

By: Team Navakal
IPL 2026
Social + WhatsApp CTA

IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून पहिल्या २० सामन्यांनंतर गुणतालिकेतील चढाओढ तीव्र झाली आहे. विशेष म्हणजे, आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी मानले जाणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे दोन्ही संघ सध्या पराभवाच्या छायेत असून त्यांची कामगिरी चाहत्यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. दोन्ही बलाढ्य संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने गमावले असले, तरी तांत्रिकदृष्ट्या त्यांच्यासाठी प्लेऑफची दारे अद्याप बंद झालेली नाहीत.

चेन्नई सुपर किंग्स: पराभवाच्या गर्तेतून सावरण्याचे आव्हान-
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात यंदा अत्यंत निराशाजनक झाली. आपल्या पहिल्या चार सामन्यांपैकी सुरुवातीचे सलग तीन सामने गमावल्यानंतर, चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून चेन्नईने आपले खाते उघडले. सध्या दोन गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर फेकला गेला आहे. संघाचा उणे -१.५३२ असा नेट रन रेट ही व्यवस्थापनासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.

सीएसकेसाठी प्लेऑफचे समीकरण काय?
चेन्नईला आता साखळी फेरीत १० सामने खेळायचे आहेत. जर त्यांना बाद फेरीत (प्लेऑफ) दिमाखात प्रवेश करायचा असेल, तर या १० पैकी किमान ८ सामने जिंकणे अनिवार्य आहे. अशा स्थितीत त्यांचे १८ गुण होतील आणि त्यांचे स्थान निश्चित होईल. मात्र, जर संघाने केवळ ७ सामने जिंकले, तर १६ गुणांसह त्यांना इतर संघांच्या जय-पराजयावर आणि ‘नेट रन रेट’वर अवलंबून राहावे लागेल. गेल्या हंगामाचा इतिहास पाहता १६ गुण पुरेसे ठरू शकतात, परंतु सुरक्षित राहण्यासाठी ८ विजयांचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे.

मुंबई इंडियन्स: सलग पराभवांचे सत्र आणि पुनरागमनाची आशा-
पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची अवस्थाही चेन्नईसारखीच आहे. मुंबईने आपला पहिला सामना जिंकून दणक्यात सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर त्यांना सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला. चार सामन्यांत केवळ एक विजय आणि तीन पराभवांसह मुंबईचा संघ दोन गुणांनिशी आठव्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रन रेट उणे -०.७७२ असून चेन्नईच्या तुलनेत तो किंचित चांगला असला तरी समाधानकारक नाही.

मुंबई इंडियन्सचा पुढील मार्ग
मुंबईला देखील अजून १० सामने खेळायचे आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना या १० पैकी किमान ७ ते ८ सामने जिंकणे गरजेचे आहे. जर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईने ७ सामने जिंकले, तर १६ गुणांसह ते शर्यतीत राहतील, पण ‘प्लेऑफ’चे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना इतर संघांच्या निकालांची प्रतीक्षा करावी लागेल. १८ गुणांचा टप्पा ओलांडल्यास मात्र मुंबई कोणत्याही अडथळ्याशिवाय बाद फेरीत प्रवेश करू शकेल.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या