KKR : इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात (IPL 2026) तीन वेळचा विजेता संघ असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. स्पर्धेतील २२ सामने पूर्ण झाले असूनही केकेआरला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. पाच सामन्यांपैकी चार सामन्यांत त्यांना पराभवाचा धक्का बसला असून पंजाब विरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाचा नुकताच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ३२ धावांनी पराभव झाला, ज्यामुळे संघ आता गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानी फेकला गेला आहे. या निराशाजनक कामगिरीवर माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आंद्रे रसेलच्या भूमिकेवरून कैफचा निशाणा-
मोहम्मद कैफच्या मते, केकेआरच्या या अधोगतीला त्यांचे व्यवस्थापन जबाबदार आहे. कैफ म्हणाला की, “कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलसारख्या मॅच-विनर खेळाडूला प्रशिक्षक बनवून मोठी तांत्रिक चूक केली आहे. रसेलमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे, त्याला प्रशिक्षक न बनवता अष्टपैलू खेळाडू म्हणून मैदानात उतरवायला हवे होते.” चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर कैफने थेट प्रश्न उपस्थित केला की, “आंद्रे रसेल हा २५ कोटींच्या कॅमेरॉन ग्रीनपेक्षा श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू नाही का? उत्तर स्पष्ट आहे, तरीही केकेआरने त्याला रिटेन न करता प्रशिक्षकाच्या भूमिकेत का पाठवले, हे अनाकलनीय आहे.” सुनील नरेनला संघात कायम ठेवले असताना रसेलला मैदानाबाहेर ठेवण्याचा निर्णय केकेआरला महागात पडत असल्याचे कैफने नमूद केले.
सेहवागचा मोलाचा सल्ला-
केकेआरच्या सलग पराभवानंतर माजी स्फोटक फलंदाज विरेद्र सेहवागने देखील संघाला मार्गदर्शन केले आहे. सेहवागने म्हटले की, केकेआरने आता आपली चूक मान्य करून पुढील सामन्यांसाठी सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवेत. चुकांमधून धडा घेतल्याशिवाय आणि त्या सुधारल्याशिवाय या स्पर्धेत पुनरागमन करणे कठीण असल्याचे त्याने स्पष्ट केले.
पुढील आव्हान आणि संघाची रचना-
केकेआरचा आगामी सामना सध्या फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. राजस्थानचा सध्याचा खेळ पाहता, अजिंक्य रहाणेच्या सैन्यासाठी हा विजय मिळवणे मोठे आव्हान असेल. या सामन्यात केकेआर आपली पहिली दोन गुण मिळवून विजयाची गुढी उभारणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ-
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, सुनील नरेन, कॅमेरॉन ग्रीन, मथिशा पाथिराना, रचिन रवींद्र, उमरान मलिक, वरुण चक्रवर्ती, रोवमन पॉवेल, मनिष पांडे, अंगकृष्ण रघुवंशी, अनुकुल रॉय, हर्षित राणा, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, फिन एलन, राहुल सिंग, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, ब्लेसिंग मुझारबानी, सार्थक रंजन, दक्ष कामरा आणि आकाश दीप.











