Home / महाराष्ट्र / Beed Massajog Election : बीडमध्ये राजकीय धुरळा!संतोष देशमुखांच्या पत्नीविरोधात स्वरूपानंद देशमुख आक्रमक.

Beed Massajog Election : बीडमध्ये राजकीय धुरळा!संतोष देशमुखांच्या पत्नीविरोधात स्वरूपानंद देशमुख आक्रमक.

Beed Massajog Election : मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आता पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला...

By: Team Navakal
Beed Massajog Election
Social + WhatsApp CTA

Beed Massajog Election : मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आता पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती; मात्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर आता गावात प्रत्यक्ष निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत दिवंगत सरपंचांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख आणि गेल्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे.

अर्ज माघारीनंतरचे चित्र स्पष्ट-
सरपंच पदासाठी एकूण पाच उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संजिवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा देशमुख या तिघांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता रिंगणात केवळ दोनच उमेदवार शिल्लक राहिले असून, निवडणूक प्रशासनाकडून त्यांना चिन्हांचे वाटपही करण्यात आले आहे. परिणामी, ‘देशमुख विरुद्ध देशमुख’ असा राजकीय संघर्ष आता अटळ झाला आहे.

राजकीय महत्त्वाकांक्षा आणि दबावाचे आरोप-
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांच्या उमेदवारीवर भाष्य करताना गंभीर दावा केला आहे. त्यांच्या मते, अश्विनी देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांचा, विशेषतः त्यांच्या दिराचा मोठा दबाव आहे. स्वरूपानंद यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय देशमुख यांना लक्ष्य करत असे म्हटले की, “काही लोकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आणि मला सरपंच पदापासून रोखण्यासाठी अश्विनी देशमुख यांना उभे करण्यात आले आहे.”

3स्वतःच्या उमेदवारीबाबत स्पष्टीकरण देताना स्वरूपानंद देशमुख अत्यंत आक्रमक झाले आहेत. “मी कोणाच्या सांगण्यावरून किंवा चिथावणीवरून उभा राहिलो आहे, असे सिद्ध झाल्यास मी संपूर्ण गावासमोर नाक घासून विरोधकांना पाठिंबा देण्यास तयार आहे,” असे जाहीर आव्हान त्यांनी दिले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, यापूर्वी गावकऱ्यांनी त्यांना साडेतीन वर्षे काम करण्याची संधी दिली होती. आता उर्वरित १८ महिन्यांच्या कार्यकाळात संतोष देशमुख यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीचे वेळापत्रक आणि गावाची उत्सुकता
मस्साजोग गावच्या या संवेदनशील पोटनिवडणुकीसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या