Jay Pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीचा समारोप होताना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सांगता सभेत एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी आपल्या भाषणातून वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला. “काय रे जय, कसा झाला दौरा?” असे विचारणारा तो हक्काचा आणि खंबीर आवाज आता आपल्यासोबत नसल्याची जाणीव करून देताना जय पवार यांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भावनिक सादेने उपस्थित जनसमुदायही हेलावून गेला.
वडिलांचा तो ठाम आवाज आणि प्रेरणा-
जय पवार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अजितदादांच्या त्या कणखर स्वभावाच्या आठवणीने केली. ते म्हणाले, “दादांचा स्वभाव एकदम स्पष्ट आणि ठाम होता. आजही मला त्यांचा तोच आवाज कानात ऐकू येतोय. ते नेहमी सांगायचे, ‘जयड्या, संकटं कितीही मोठी असली तरी रडायचं नाही, तर पूर्ण ताकदीने लढायचं’. वडिलांनी दिलेली हीच शिकवण आज मला या कठीण काळात पुढे जाण्याचे बळ देत आहे.” दादांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक लढवणे किती आव्हानात्मक आहे, याची जाणीव त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवत होती.
प्रचार नव्हे, हे तर ‘कौटुंबिक’ ऋणानुबंध-
या निवडणुकीच्या प्रचाराकडे आपण केवळ एक राजकीय प्रक्रिया म्हणून पाहत नसल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “हा केवळ माझ्या आईसाठी केलेला प्रचार नाही, तर मी माझ्या बारामतीमधील विशाल कुटुंबाला भेटत आहे. बारामती ही दादांची कर्मभूमी आहे आणि इथला प्रत्येक नागरिक आमचा रक्ताचा नातेवाईक आहे. लोकांच्या गाठीभेटी घेऊन मी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहे. पूर्वी जेव्हा दादांसोबत प्रचार असायचा, तेव्हा रॅली काढण्यात आणि लोकांशी संवाद साधण्यात एक वेगळाच उत्साह असायचा; मात्र आज परिस्थिती बदलली आहे.”
रात्रीचा तो अखेरचा फोन आणि विरघळलेले स्वप्न-
आपल्या दैनंदिन दिनचर्येतील एक हळवा कोपरा उलगडताना जय पवार पुढे म्हणाले, “गेल्या निवडणुकीत जेव्हा मी सांगता सभेत पहिले भाषण केले होते, तेव्हा दादा स्वतः समोर बसून माझे बोलणे ऐकत होते. ते माझे त्यांच्यासमोरील शेवटचे भाषण ठरेल, असे मला कधीच वाटले नव्हते. दररोज रात्री आमचे दौरे संपले की दादा विचारायचे ‘काय रे जय, आजचा दौरा कसा झाला? प्रतिसाद कसा आहे?’ अशी विचारपूस करणारा तो मायेचा आवाज आता कायमचा शांत झाला आहे. त्यांची ही उणीव पावलोपावली भासत आहे.”
“अजितदादांनी जातीपातीचे नव्हे, तर माणुसकीचे नाते जपले”; जय पवारांचे भावूक आवाहन, बारामतीकरांना दिली ‘आय लव्ह यू टू’ची साद-
बारामती: “संकटसमयी खचून न जाता ‘जयड्या रडायचं नाही, लढायचं’ हा मंत्र देणारा दादांचा तो खंबीर आवाज आजही माझ्या कानात घुमतोय. अजितदादांनी आपल्या हयातीत कधीही जातीपातीचे संकुचित राजकारण केले नाही; तर सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासाचा डोंगर उभा केला,” अशा शब्दांत जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला. बारामती पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत बोलताना जय पवार यांनी केवळ आपल्या भावनाच मांडल्या नाहीत, तर बारामतीकरांशी असलेल्या पिढ्यानपिढ्यांच्या ऋणानुबंधांनाही वाट करून दिली.
ऐतिहासिक वारसा आणि बिनविरोध निवडणुकीची खंत-
अजितदादांच्या राजकीय प्रवासाचा गौरव करताना जय पवार म्हणाले की, दादांनी केवळ बारामतीचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करत विकासकामांत मोठे योगदान दिले आहे. दादांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली असती, तर ती त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरली असती, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. तथापि, नियतीला काही वेगळेच मान्य होते आणि त्यामुळेच आज ही निवडणूक लढवावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. “दादा जाताना इतिहास घडवून गेले; त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या,” असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
“बारामतीकर, आय लव्ह यू टू!”-
आपल्या भाषणादरम्यान जय पवार यांनी अत्यंत साध्या आणि थेट भाषेत बारामतीच्या जनतेशी संवाद साधला. भाषणाच्या ओघात जेव्हा उपस्थितांनी आपल्या लाडक्या नेत्यावर प्रेमाचा वर्षाव केला, तेव्हा जय पवार यांनीही तितक्याच उत्स्फूर्तपणे “बारामतीकर, आय लव्ह यू टू!” असे म्हणत या नात्याची वीण अधिक घट्ट केली. “ज्याप्रमाणे तुम्ही अनेक दशके दादांवर निरपेक्ष प्रेम केले आणि दादांनीही तुम्हाला आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग मानले, तसेच प्रेम आता आईला म्हणजेच सुनेत्रा वहिनींना द्या,” असे आवाहन त्यांनी केले.










