Maharashtra Goverment Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, २२ एप्रिल रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक विकासाला गती देणारे अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) या निर्णयांची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली असून, यामध्ये बायोगॅस धोरण आणि सातारा जिल्ह्याच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.
‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण २०२६’ ला मान्यता-
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण (CBG) २०२६’ जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून, बायोगॅस प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) आणि हायब्रीड अन्युईटी तत्त्वावर राबवले जातील. चालू वर्षासाठी या योजनेकरिता ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन होण्यास मदत होईल आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होऊन प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल.
शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकांना मोठा दिलासा-
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सात आदर्श महाविद्यालयांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या महाविद्यालयांतील शिक्षकांना आता सुधारित मूळ वेतन मिळणार आहे. इतकेच नव्हे तर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आगामी पदभरतीमध्ये या शिक्षकांना अनुभवाचे अतिरिक्त गुण देऊन प्राधान्य दिले जाणार आहे, ज्यामुळे रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग येईल.
साताऱ्यात आयटी पार्क आणि महसूल निर्णयांची पुनर्रचना-
सातारा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी येथे आयटी पार्क (IT Park) उभारण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (MIDC) ४२.५५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे सातारा आणि परिसरातील युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. तसेच, महसूल विभागाने कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार, जमिनीचे ‘भोगवटादार वर्ग-२’ मधून ‘भोगवटादार वर्ग-१’ मध्ये रूपांतर करण्याच्या अधिमुल्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून, तशी अधिसूचना लवकरच निर्गमित केली जाईल.
के.ई.एम. रुग्णालयाचे नामांतर: लोढांचे महापालिकेला पत्र
मंत्रिमंडळ निर्णयांसोबतच मुंबईतील ऐतिहासिक किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालयाच्या नामांतराचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्याचे मंत्री आणि भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहून या रुग्णालयाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.











