Home / देश-विदेश / Assembly Election Results 2026 : ५ राज्यांच्या निकालात भाजपची अभूतपूर्व मुसंडी; पाहा कोणत्या राज्यात कोणाची सत्ता?

Assembly Election Results 2026 : ५ राज्यांच्या निकालात भाजपची अभूतपूर्व मुसंडी; पाहा कोणत्या राज्यात कोणाची सत्ता?

Assembly Election Results 2026 : गेल्या काही आठवड्यांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आणि महाराष्ट्रातील २...

By: Team Navakal
Assembly Election Results 2026:
Social + WhatsApp CTA

Assembly Election Results 2026 : गेल्या काही आठवड्यांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आणि महाराष्ट्रातील २ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना मतदारांनी नाकारून मोठा राजकीय बदल घडवून आणला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे ऐतिहासिक ‘महापरिवर्तन’-
पश्चिम बंगालमध्ये गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे. एकूण २९३ जागांच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक १९५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे, तर तृणमूल काँग्रेसला केवळ ९२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत डाव्या पक्षांना केवळ २ जागा मिळाल्या असून काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही; इतर उमेदवारांनी २ जागांवर विजय मिळवला.

तामिळनाडूमध्ये थलपथी विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाची मुसंडी-
तामिळनाडूच्या राजकारणात प्रदीर्घ काळानंतर पारंपरिक द्राविडी पक्षांना बाजूला सारत एका नव्या पक्षाने सत्ता काबीज केली आहे. सुपरस्टार विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने १०६ जागा जिंकून राज्यात नवा इतिहास रचला आहे. तर सत्ताधारी द्रमुक पक्षाला ६८ आणि अण्णा द्रमुक पक्षाला ५८ जागांवर विजय मिळवता आला. या ऐतिहासिक निकालामुळे द्राविडी राजकारणाला मोठा धक्का बसला आहे.

केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड ढासळला-
केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची आपली परंपरा मतदारांनी कायम ठेवली आहे. येथे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने (UDF) १४० पैकी १०४ जागा जिंकून स्पष्ट बहुमतासह सत्ता हस्तगत केली आहे. तर पिनराई विजयन यांच्या डाव्या आघाडीला (LDF) केवळ ३४ जागा मिळाल्या असून इतरांनी २ जागा जिंकल्या आहेत.

आसाममध्ये भाजपचे वर्चस्व कायम-
आसाममध्ये पुन्हा एकदा मतदारांनी भाजप सरकारवर आपला विश्वास दाखवला आहे. १२६ जागांच्या विधानसभेत भाजपने एकट्याने १०० जागा जिंकून सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. येथे काँग्रेसला केवळ २० जागा जिंकता आल्या, तर इतर पक्षांना ६ जागांवर यश मिळाले.

पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीची सत्ता कायम-
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि एआईएनआरसी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) २२ जागांवर विजय मिळवून सत्ता राखली आहे. येथे काँग्रेसला केवळ ६ जागांवर विजय मिळवता आला, तर १ जागा अपक्षाच्या पदरात पडली.

५ राज्यांच्या निवडणुकांसोबतच महाराष्ट्रात पार पडलेल्या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचंड विजय संपादन केला आहे.
बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रीय विक्रम-
दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी २४ व्या फेरीअखेर २ लाख १८ हजार ९३० मतांचे प्रचंड मताधिक्य मिळवून देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा नवा इतिहास रचला आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार वगळता इतर सर्व २२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

राहुरी पोटनिवडणूक: अक्षय कर्डिले यांचा लाखांच्या फरकाने विजय-
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी १ लाख १२ हजार ५८७ मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवून वडिलांचा राजकीय गड राखला. अक्षय कर्डिले यांना मिळालेल्या या लाखांच्या मताधिक्यासमोर विरोधकांचा सुपडा साफ झाला. येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना अवघी २७ हजार ५०६ मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीच्या संतोष चोळके यांना ५ हजार ६९० मते आणि अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना ७ हजार २९९ मते मिळाली.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या