Opration Tiger : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच प्रचंड खळबळ उडालेली असताना, आता उबाठा गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उबाठाच्या एकूण २० आमदारांपैकी तब्बल १४ आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांनीही या दाव्याला दुजोरा दिल्याने, राजकीय वर्तुळात आता ‘ऑपरेशन टायगर’ नंतर ‘ऑपरेशन टायगर २.०’ ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या नव्या दाव्यामुळे उबाठा गोटात कमालीची अस्वस्थता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार संतोष बांगर यांनी आपल्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, “मी साधारण सहा महिन्यांपूर्वीच भाकीत केले होते की, उबाठाचे काही खासदार लवकरच शिंदे गटात सामील होतील; आणि आज ती गोष्ट प्रत्यक्षात खरी ठरली आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह सहाही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गतिमान नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. हिंगोलीमध्ये आम्ही खासदार आष्टीकर यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले असून, त्यांच्या आगमनामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेला मोठी ताकद मिळेल.” पुढे सूचक इशारा देताना बांगर म्हणाले, “आगे आगे देखो होता है क्या! आगामी काळात उबाठाचे १४ आमदारही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील. कारण हिंदूधुरंधर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाचा आणि लोककल्याणाचा खरा विचार केवळ एकनाथ शिंदे हेच पुढे नेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा सर्वसामान्य जनता, सर्वच स्तरांतून शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे.”
दुसरीकडे, राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही उबाठा आमदारांच्या अंतर्गत नाराजीवर बोट ठेवले. ते म्हणाले, “उबाठा पक्षातील लोकप्रतिनिधींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र अस्वस्थता आणि खदखद आहे. आम्ही सर्व आमदार आणि खासदार सभागृहात किंवा मंत्रालयात वारंवार एकत्र येत असतो, एकमेकांशी संवाद साधत असतो. त्यामुळे तिथली परिस्थिती आम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आज सहा खासदारांनी उचललेले पाऊल म्हणजे याच अंतर्गत असंतोषाचा स्फोट आहे. उबाठाच्या आमदारांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही; उलट त्यांना सध्याच्या नेतृत्वाकडून कोणतेही राजकीय बळ किंवा मतदारसंघाच्या विकासासाठी सहकार्य मिळत नसल्याने ते अधिक त्रस्त आहेत.











