Mamata Refuses to Resign After Results – पश्चिम बंगाल निकालानंतर राजकीय वातावरण तापले असून, ममता बॅनर्जींनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला कट रचून हरवले गेले. त्यामुळे मी राजभवनात जाऊन राजीनामा देणार नाही. आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न झाला आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आम्हाला अधिकृतपणे पराभूत करू शकते, पण आम्ही नैतिकदृष्ट्या निवडणूक जिंकली आहे.
पश्चिम बंगालसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. बंगालमध्ये भाजपाने 294 पैकी 207 जागा जिंकून पहिल्यांदाच सत्ता मिळवली आहे. तर ममता यांच्या तृणमूलला केवळ 78 जागा मिळाल्या. 15 वर्षांनंतर ममता बॅनर्जींची सत्ता गेल्यामुळे ममता संतप्त झाल्या आहेत. त्यांनी आज भाजपावर अनेक आरोप केले. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी का जाऊ? आम्ही हरलोच नाही. जिंकलो असतो तर शपथेपूर्वी राजीनामा दिला असता. आता राजभवनात जाण्याचा प्रश्नच नाही. ते चोरी करून जिंकले म्हणून मला राजीनामा द्यावा लागेल असे त्यांना वाटत असेल, तर तसे होणार नाही.
ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले. त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टी आणि भारत निवडणूक आयोग यांच्या संगनमतातून हा निकाल लागला आहे.निवडणूक आयोगाने लोकांचे संविधानिक अधिकार हिरावून घेतले आणि ईव्हीएममध्ये गैरव्यवहार केला. मतदानाच्या दोन दिवस आधी आमच्या कार्यकर्त्यांना अटक करून छापे टाकण्यात आले. आयपीएस आणि आयएएस अधिकार्यांचे मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या. एसआयआरच्या नावाखाली 100 जागा लुटल्या. एसआयआर प्रक्रियेत 90 लाख नावे वगळण्यात आली होती. न्यायालयात गेल्यानंतर 32 लाख नावे पुन्हा समाविष्ट करण्यात आली. भाजपा अतिशय कपटी खेळी खेळली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेही यात सहभागी होते. भाजपाने मतमोजणी केंद्रांवर ताबा मिळवला होता. आमच्या प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात जाऊ दिले गेले नाही. सीआरपीएफ आणि बाहेरील गुंडांनी मारहाण केली. माझी गाडी थांबवली गेली. मलाही आत जाऊ दिले नाही. माझ्यावर हल्ला झाला. पोट आणि पाठीवर लाथा मारल्या. मला ढकलून बाहेर काढले. मी राजीव गांधी, मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक सरकारे पाहिली आहेत, पण असे अत्याचार मी कधीही पाहिले नाहीत. अशी निवडणूक कधी पाहिली नाही. मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतरच, भाजप 195-200 जागा जिंकत आहे, असे ते म्हणू लागले. आम्ही निवडणूक आयोगावर कारवाई करू. आम्ही आता काय करणार आहोत, हे मी उघड करणार नाही. पण आम्ही 5 खासदारांसह 10 जणांची एक तथ्य-शोधक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
प. बंगाल मुख्यमंत्री निवडीसाठी
गृहमंत्री अमित शहा पर्यवेक्षक
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर भाजपाने या राज्यांसाठी मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी पर्यवेक्षक आणि सहपर्यवेक्षकांची निवड केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे, तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहपर्यवेक्षक असतील. 9 मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल.
बंगाल निवडणुकीत अमित शहा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. उमेदवार निवडीपासून पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रचारसभा आणि रोड शोही केले होते. त्यामुळेच भाजपाच्या विजयानंतर पर्यवेक्षक म्हणून त्यांच्यावरच जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते येत्या दोन-तीन दिवसांत पश्चिम बंगालमध्ये जाऊन भाजपा आमदारांशी चर्चा करणार आहेत. 9 मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी होईल. या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आहे, अशी माहिती भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी दिली.
ममता बॅनर्जी यांना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुवेंदू अधिकारी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ममता बॅनर्जींच्या विरोधात एकहाती लढा देऊन भाजपाला पश्चिम बंगालमध्ये यश मिळवून दिले आहे. ते अमित शहा यांच्या मर्जीतील आहेत. मात्र, भाजपा अनेकदा धक्कातंत्राचा वापर करते. तसा तो पश्चिम बंगालमध्येही वापरणार का, याबद्दल उत्सुकता आहे.
अधिकारी यांच्याव्यतिरिक्त माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, सध्याचे प्रदेशाध्यक्ष शामिक भट्टाचार्य, उत्पल ब्रह्मचरराव आणि स्वपन दासगुप्ता, रुपा गांगुली आणि अग्निमित्रा पॉल यांची नावे
चर्चेत आहेत. आसामसाठी भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची पर्यवेक्षकपदी निवड करण्यात आली असून हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी सहपर्यवेक्षक आहेत. पुद्दुचेरीसाठी मनसुख मांडविया आणि निर्मल कुमार यांच्या पर्यवेक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तामिळनाडूत त्रिशंकू

तामिळनाडूत सिनेअभिनेते विजय यांच्या टीव्हीकेने 108 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. मात्र, बहुमतासाठी 118 जागांची गरज असल्याने टीव्हीकेला अजून 10 जागांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. यासाठी टीव्हीकेला द्रमुक किंवा अण्णाद्रमुक यांची मदत घ्यावी लागणार आहे. टीव्हीकेची प्रमुख विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकरांना पत्र लिहून सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देण्याची विनंती केली आहे. तसेच विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्याची मागणीही केली आहे.









