Kerala Chief Minister : केरळमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (युडीएफ)ने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतरही मुख्यमंत्रिपदासाठी नाव अजूनही जाहीर झालेले नाही. मुख्यमंत्रिपदासाठी के.सी.वेणुगोपाल, व्ही.डी.सतीशन आणि रमेश चेन्निथला हे तीन नेते स्पर्धेत असून त्यातील एक नाव निवडण्यासाठी गेले सहा दिवस चर्चा आणि बैठका सुरू आहेत. या नेत्यांपैकी कुणाचेही नाव अंतिम केले तरी इतर दोन नेते नाराज होण्याची भीती आहे. त्यामुळे काँग्रेसने नेहमीप्रमाणे घोळ घालत शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्रिपदाचे नावच न जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे.
4 मे रोजी देशातील 5 राज्यांतील निवडणुकांचे निकाल लागले. बंगालमध्ये 5 दिवसांत भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. आज विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आसाम आणि पुद्दुचेरीमध्येही तारखा आणि मुख्यमंत्र्यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. पण केरळमध्ये घवघवीत यश मिळवणारी काँग्रेस सहा दिवसांनंतरही मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवू शकलेली नाही. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी वेणुगोपाल, सतीशन आणि रमेश चेन्निथला हे प्रमुख दावेदार असल्याने हा तिढा निर्माण झाला आहे. या तिन्ही नेत्यांचे तीन स्वतंत्र गट असून आपल्याच नेत्याने मुख्यमंत्री व्हावे, यासाठी तिन्ही गटांनी दबाव निर्माण केला आहे.
के.सी.वेणूगोपाल हे राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू आणि पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस आहेत. त्यांचे दिल्लीतही वजन आहे. केरळमध्ये पक्ष संघटनेवर त्यांची मजबूत पकड आहे. धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. केरळ निवडणुकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यातही त्यांचा सहभाग होता. 61 वर्षीय सतीशन केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. पारावूरमधून ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. निवडणुकीदरम्यान ते युडीएफ आघाडीचा चेहरा होते. कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. रमेश चेन्निथला हरिपद मतदारसंघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या तीन दावेदारांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. सतीशन यांच्या आधी केरळ विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते. 2021 मध्ये विरोधी पक्षनेते न केल्यामुळे चेन्निथला नाराज होते. याशिवाय युडीएफमधील इतर पक्षांनाही संधी मिळाली तर मुख्यमंत्रीपद हवे आहे.
निकालानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अजय माकन, मुकुल वासनिक आणि दीपा दासमुंशी यांना निरीक्षक म्हणून केरळला पाठवले होते. या तिघांनी 7 मे रोजी तिरुवनंतपुरममध्ये काँग्रेस आमदार आणि वरिष्ठ नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा केली. या बैठकीत सहभागी झालेल्या 63 आमदारांपैकी 75 टक्के आमदारांनी के.सी.वेणुगोपाल यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. बैठकीत सतीशन यांना केवळ 6 आमदारांचा पाठिंबा मिळाला. तर चेन्नीथला यांना 8 मते मिळाली. उर्वरित आमदारांनी ते काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाला पाठिंबा देतील, असे म्हटले. वेणुगोपाल यांना विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. तर पण सतीशन यांनी दिल्लीतून आलेल्या निरीक्षकांना आणि काँग्रेस निरीक्षकांना स्पष्टपणे सांगितले की, त्यांना मुख्यमंत्रिपदापेक्षा कमी काहीही मान्य करणार नाही. याशिवाय सतीशन यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
काल केरळमधील मुख्यमंत्री निवडण्यासाठी अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले तीन नेते, केरळमधील इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी कोण योग्य ठरेल यावर सर्वांनी आपली मते मांडली. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या तिन्ही नेत्यांनीही आपली बाजू मांडली. ही बैठक तीन तासांहून अधिक काळ चालली. मात्र बैठक संपल्यावर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय खरगे आणि राहुल गांधी घेतील, असे सांगण्यात आले.
राहुल गांधी यांनी आपली पसंती वेणुगोपाल यांच्या नावाला दिली आहे. असे कळते की, राहुल गांधी यांनी वेणुगोपाल यांच्याबरोबर खासगीत बैठकही घेतली. त्यांनी पक्षात समर्थन वाढवा, असा सल्ला वेणुगोपाल यांना दिला. कालच्या बैठकीत राहुल गांधी यांनी सतीशन यांना वेणुगोपाल यांच्या विरोधात मोहीम राबवत असल्याचा थेट आरोप केला. सतीशन यांनी वेणुगोपाल यांना विरोध केल्याचे मान्य केले. परंतु वेणुगोपाल पक्षात गटबाजी करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे राहुल गांधींसमोरच केरळमधील गटबाजीचे प्रदर्शन झाले. त्यामुळे केरळच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.









