Two motormen die : मुंबईत लोकल ट्रेनच्या दोन मोटरमनचा एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अनुज प्रसाद सिंग आणि मोहसिन खान अशी मृत मोटरमनची नावे असून दोघेही पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत होते. यापैकी मोहसिन खान यांचा ड्युटीवर असतानाच मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन मोटरमनचा मृत्यू झाल्याने कामाच्या वाढत्या ताणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मागील काही वर्षांपासून मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर यांच्या कामाच्या कालावधीत सुधारणा करण्याची मागणी होत आहे. मोटरमनना वर्षातील जवळपास 365 दिवस सुट्टीशिवाय काम करावे लागत असून, अनियमित आणि तणावपूर्ण शेड्युलमुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून लोकल ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत होत असल्याने गाड्या उशिराने धावत आहेत. याचा थेट परिणाम मोटरमनच्या विश्रांतीच्या वेळेवर होत असून, त्यांना नाश्ता किंवा जेवणासाठीही पुरेसा वेळ मिळत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दोन्ही सहकार्यांच्या निधनानंतर येत्या मंगळवारी सायंकाळी 4 वाजता चर्चगेट येथील मोटरमन लॉबीमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
डिसेंबरपासून मुंबईतील आठ मोटरमन वैद्यकीयदृष्ट्या अनफीट असल्याचे सांगितले जात आहे. मोटरमन तसेच ट्रेन मॅनेजर यांच्या संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून कामाच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली जात आहे. मात्र अजूनही याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. वाढत्या तणावामुळे आरोग्याचे प्रश्न गंभीर होत आहेत, असे कर्मचार्यांचे म्हणणे आहे.








