Home / देश-विदेश / Somnath Temple : १००० वर्षांनंतर पुन्हा झळाळले वैभव; सोमनाथ मंदिराच्या शिखरावर ९० मीटर उंचीवर मोदींच्या हस्ते कुंभाभिषेक- वायूसेनेची मानवंदना!

Somnath Temple : १००० वर्षांनंतर पुन्हा झळाळले वैभव; सोमनाथ मंदिराच्या शिखरावर ९० मीटर उंचीवर मोदींच्या हस्ते कुंभाभिषेक- वायूसेनेची मानवंदना!

Somnath Temple : स्वतंत्र भारताच्या इतिहासात ११ मे १९५१ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण याच दिवशी नव्याने उभारलेल्या...

By: Team Navakal
Somnath Temple
Social + WhatsApp CTA

Somnath Temple : स्वतंत्र भारताच्या इतिहासात ११ मे १९५१ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण याच दिवशी नव्याने उभारलेल्या सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. आज या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सोमनाथमध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन किलोमीटरचा भव्य ‘रोड शो’ आणि त्यानंतर पार पडलेला मंदिराचा कुंभाभिषेक सोहळा.

सरदार पटेलांना अभिवादन आणि रोड शो-
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन किलोमीटरचा रोड शो करत जनसमुदायाचा उत्साह स्वीकारला. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे शिल्पकार भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी मुख्य मंदिरात प्रवेश करून भगवान सोमनाथाचा जलाभिषेक आणि विशेष षोडशोपचार पूजा संपन्न केली.

९० मीटर उंचीवर कुंभाभिषेक आणि पुष्पवृष्टी-
मंदिराच्या शिखरावरील कुंभाभिषेकाचा सोहळा अत्यंत प्रेक्षणीय होता. ११ पवित्र तीर्थक्षेत्रांहून आणलेले जल एका भव्य कलशात भरून ९० मीटर उंच क्रेनच्या सहाय्याने मंदिराच्या शिखरापर्यंत नेण्यात आले. पंतप्रधान मोदींनी रिमोट कंट्रोलद्वारे या सुवर्ण कळसावर जलाभिषेक केला. ज्या वेळी गाभाऱ्यात वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात पूजा सुरू होती, त्याच वेळी बाहेरून भारतीय वायूसेनेच्या ‘चेतक’ हेलिकॉप्टरद्वारे मंदिराच्या शिखरावर आणि परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

वायुसेनेचा ‘सूर्यकिरण’ हवाई शो आणि इतिहासाची आठवण-
या उत्सवाचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे भारतीय वायूसेनेच्या ‘सूर्यकिरण’ टीमचे एरोबॅटिक प्रदर्शन. जामनगर हवाई दल तळावरून आलेल्या विमानांनी सुमारे १५ मिनिटे सोमनाथ मंदिराच्या आकाशात चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. योगायोगाने २०२६ हे वर्ष एका ऐतिहासिक संदर्भानेही महत्त्वाचे आहे. इ.स. १०२६ मध्ये महमूद गजनवीने या मंदिरावर आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले होते. त्या दुःखद घटनेला आज १००० वर्षे पूर्ण होत असताना, सोमनाथ मंदिराने पुन्हा एकदा आपले वैभव आणि सामर्थ्य जगासमोर सिद्ध केले आहे.

संग्रहालयाला भेट आणि प्राचीन अवशेषांचे दर्शन-
हवाई शो संपल्यानंतर पंतप्रधानांनी सोमनाथ ट्रस्टच्या संग्रहालयाला भेट दिली. या संग्रहालयात मंदिराच्या प्राचीन वास्तुकलेचे अवशेष आणि उत्खननात सापडलेल्या ऐतिहासिक वस्तू जतन करण्यात आल्या आहेत.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या