G. D. Madgulkar : महाकाव्य गीत रामायण ज्या निवासात लिहिले ते कवी दिवंगत ग.दि. माडगुळकर यांचे पुण्यातील ऐतिहासिक निवासस्थान पंचवटी त्यांच्याच काही नातेवाईकांनी बिल्डरला विकण्याचा घाट घातला आहे, असा दावा गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी आज प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना केला. जीव गेला तरी गदिमांचा वारसा सांगणारी ही ऐतिहासिक वास्तु आपण विकू देणार नाही. हिंमत असेल तर पंचवटीला हात लावून दाखवा, असे आव्हान सुमित्र यांनी संबंधितांना दिले आहे.
गदिमांनी हयात असताना म्हटले होते की, जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे तोपर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील. तिच पवित्र वास्तू पंचवटी पाडावी, बिल्डरला विकावी यासाठी जवळच्या नातेवाईकांकडून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. या नातेवाईकांमध्ये असे लोक आहेत ज्यांनी पंचवटीवर, गदिमांवर मोठ-मोठी पुस्तके लिहिली आहेत. माझ्यावर गेले काही महिने पंचवटी विकण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी जीवात जीव असेपर्यंत विरोध करत राहीन. केवळ पैशांच्या लोभापोटी हे लोक गदिमांची पवित्र वास्तु पाडू किंवा विकू देणार नाही’ असे सुमित्र माडगुळकर म्हणाले.
पंचवटी पाडण्यास आपण विरोध करत असल्याने संबंधित लोकांनी आपली आणि आपल्या कुटुंबियांची बदनामी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. कुटुंबातील ज्या स्त्रिया संसारात सुखी नाहीत त्यांनी पोस्ट टाकून आपली बदनामी सुरू केली आहे, असा आरोपही सुमित्र माडगुळकर यांनी केला. आम्ही गदिमा यांचे स्मारक पुण्यात असावे यासाठी प्रयत्न केले, जनतेने त्यासाठी निधी दिला, त्या स्मारकाची भिंत उभी राहिली आहे, असे असताना त्यांचेच नातेवाईक त्यांची पंचवटी विकायला निघाले आहेत.
तेव्हा तू कुठे होतास?
सुमित्र श्रीधर माडगूळकर
1) जेव्हा पंचवटीला रंग द्यायला हवा होता तेव्हा बाबांना पैसे तर दिले नाहीसच पण विरोधच केलास. तेव्हा तुला असे वाटले नाही का की आपलेही काही कर्तव्य आहे.
2) पंचवटीचा पुढचा भाग पडायला आला होता तेव्हा बाबांनी आणि काकांनीच तो दुरुस्त केला होता.
3) अजूनही पंचवटीच्या अंगण झाडण्याचे आणि रक्षणाचे काम करण्याचे पैसे मी आणि काकू देतो
4) पंचवटीसाठी बिल्डर बघायला तूच पुढे होतास. जेव्हा तुला कळले की बाबांनी Will माझ्या नावावर केले आहे तेव्हा तू 50% तुला हवेत आणि लीनताला जिने तुला वेळोवेळी मदत केली तिला नंतर द्यावेत
असे तू सांगितलंस.
5) पंचवटीच्या भिंतींनी कधीही ऐकली नाही अशी अर्वाच्य भाषा तू स्वतःच्या आईला, बहिणीला आणि मेव्हण्याला वापरलीस की ज्यांनी तुला तुझ्या अडचणीच्या काळात मदत केली.
6) बाळा, आता तरी सुधार. खोटे वागण्याचे बंद कर. अजून वेळ गेलेली नाही. शेवटी सत्याचा विजय होतो आणि प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगायला लागते हे लक्षात असू दे.
7) आज पैशाच्या लोभाने तू आपली माणसे दूर करत आहेस. पण हीच माणसे तुझ्या प्रत्येक अडचणीला उभी राहिली आहेत हे कायम लक्षात ठेव. जेव्हा तुझ्या हे लक्षात येईल तेव्हा खूप उशीर झाला असेल.
वेळीच सावर.
8) आता तुझ्या चुकीच्या वागण्याचे समर्थन तू पंचवटीच्या पाडण्याच्या पोस्टने केले आहेस. लोकांच्या गदिमांविषयीच्या प्रेमाचा, आदराचा गैरफायदा घेण्याचा तुझा हा प्रयत्न चुकीचा आहे.
9) गदिमांच्या आणि रामरायाच्या खालच्या हॉलमधल्या फोटोसमोरच्या टेबलवर, बाहेर जाताना पादत्राणे ठेवताना आपल्या आजोबांच्या थोरपणाची जाणीव कुठे जाते? कोणी पाहुणे आले की आम्हाला उचलून ठेवायला लागतात.
10) जेव्हा ड्रेनेज नको त्या वस्तू टाकल्यामुळे तुंबते, पाणी तुळशीकट्ट्यापर्यंत जाते ते तुला कधीच दिसत नाही. मी आणि काकूच ते उभे राहून करून घेतो.
11) नामुष्कीची वेळ तुझ्या वागण्यामुळेच माझ्यावर आली आणि तो घाणेरडा आरोप तू माझ्यावर करतोस याला काय म्हणू?
असो. परमेश्वर सारे बघत असतो आणि सत्याचा विजय होतो असा माझा विश्वास आहे. तुला लिहिलेली ही शेवटची पोस्ट!
तुझी दुर्दैवी आई










