Prime Minister Modi : आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी परकीय चलन वाचविण्याकरिता पंतप्रधान मोदी यांनी काल सामान्य जणांवर मोठी जबाबदारीच टाकली. एक वर्ष सोने घेऊ नका, मेट्रोने प्रवास करा, वर्क फ्रॉम होम करा, परदेशी प्रवासाला जाऊ नका, रासायनिक खते वापरू नका, स्वयंपाकात तेलाचा वापर कमी करा, पेट्रोल-डिझेल कमीत कमी वापरा, असा सल्ला त्यांनी काल दिला आणि आज सराफा बाजारापासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी या सल्ल्यावर संताप व्यक्त केला. सराफा बाजार तर आज सकाळीच कोसळला. एक वर्ष सोने खरेदी केले नाही तर एक कोटी कामगारांचा रोजगार जाईल, अशी तक्रार सोने व्यापार्यांनी केली.वडोदरा येथे संध्याकाळी झालेल्या ‘सरदार गौरव रत्न’ सोहळ्यात मोदी म्हणाले की, इंधन वाचवण्यासाठी शाळांनी काही काळ ऑनलाईन क्लासेस घ्यावेत.
ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी काऊंन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले की, सोने विकत न घेण्याच्या आवाहनाचा दुरगामी विपरीत परिणाम होऊ शकतो. सराफा बाजारावर त्याचा विपरित परिणाम होईल. जेडीपीमध्ये सराफा उद्योगाचे 60 टक्के योगदान आहे. त्यावरही मोठा परिणाम होईल. सराफा बाजाराप्रमाणेच परदेशी प्रवासाला घेऊन जाणार्या पर्यटन कंपन्यांवरही मोठा परिणाम झाला. या सर्व कंपन्याचे शेअर आज कोसळले. त्यामुळे या उद्योगाशी संबंधित सर्व भडकले होते. सामान्य माणसांनी आज सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात मीम्स आणि कार्टून टाकून आपला संताप व्यक्त केला. आम्हाला दुचाकी आणि चारचाकी चालवू नका, असा सल्ला देण्यापेक्षा राजकारण्यांनी त्यांचे दौरे आणि रोडशो बंद करावेत. लग्न समारंभासाठी सुद्धा हेलिकॉप्टरने जाणार्या राजकारण्यांनी इंधन बचतीसाठी लोकलने प्रवास करावा, सामान्य माणसाला मेट्रोचे भाडे परवडत नाही हे सुद्धा या राजकारण्यांना माहिती नाही, आम्ही मेट्रोने जावे असे वाटत असेल तर मेट्रोचा दर कमी करावा, असाही सल्ला अनेकांनी दिला. दरवेळी सामान्य माणसानेच त्याग करायचा, देशभक्तीची ग्वाही देऊन सामान्य माणसालाच वेठीस धरायचे हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. स्वयंपाकात तेलाचा वापर कमी करावा या सल्ल्यावर गृहिणींनी संताप व्यक्त केला. खाद्यतेलाच्या किमती आधीच भडकल्या असल्याने आम्ही आधीच तेलाचा वापर कमी केला आहे, आता बिनतेलाच्या भाज्या करायच्या का? असा सवाल या गृहिणींनी विचारला.
मोदींनी रासायनिक खते न वापरता शेतात सेंद्रीय खते वापरावीत, असा सल्ला दिला आहे. याचे कारण म्हणजे रासायनिक खते आणि आयात करतो. मात्र त्यांचा हा सल्ला प्रत्यक्षात आणणे अशक्य आहे, असे 90 टक्के शेतकर्यांचे म्हणणे आहे. रासायनिक खते वापरल्याशिवाय आता शेती होऊ शकत नाही. फळभाज्या असो, धान्य असो किंवा फळांची लागवड असो प्रत्येक ठिकाणी रासायनिक खते वापरावीच लागतात. याचे कारण रासायनिक खते वापरून मातीची पोत गेल्याने त्या मातीवर आता सेंद्रीय खेत वापरून काहीही उपयोग नाही. सेंद्रीय खत वापरायचे असेल तर किमान पाच वर्षे शेतीत कोणतेही पीक न घेता शेत रिकामे ठेवावे लागेल. त्यानंतरच मातीची पोत काहीशी सुधारून सेंद्रीय खताचा वापर होऊ शकतो. मात्र हेलिकॉप्टरने फिरणार्या राजकारणार्यांना हेही माहित नसल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. आजच्या परिस्थितीत रासायनिक खतांची आयात बंद केली तर शेती कोलमडून जाईल, अशी परिस्थिती आहे, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशभक्तीची आण देत देशवासियांना काटकसरीचा सल्ला दिला आहे. दुर्दैवाने हा सल्ला प्रत्यक्षात आणणे हे सामान्य देशवासियांच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे हा सल्ला कागदावर योग्य असला तरी ते प्रत्यक्षात येणे अशक्य वाटते. सर्वच उद्योगातील माणसे आज त्रस्त झाली आहेत. मात्र कोणीही उघडपणे बोलायला किंवा कॅमेरासमोर याबद्दल बोलण्यास तयार नाही.
‘सरदार गौरव रत्न’ सोहळ्यात इंधन वाचवण्यासाठी आणखी एक सल्ला देताना मोदी म्हणाले की, डिजीटल टेक्नोलॉजीने आता खूप गोष्टी सोप्या केल्या आहेत. टेक्नोलॉजीची मदत आपल्या सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरेल. हे जरुरी आहे की, सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांमध्ये व्हर्च्युअल मीटिंग आणि वर्क फ्रॉम होमला प्राथमिकता दिली जावी. मी काही शाळांनादेखील आग्रह करेन की, काही कालावधीसाठी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आताच्या घडीला ज्या प्रकारची जागतिक पातळीवर परिस्थिती तयार झाली आहे, त्याचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तान तर पेट्रोलचे भाव साडेचारशे रुपये इतके वर गेले आहेत. पेट्रोल डिझेल याची अनेक देशात कमतरता आहे. आपल्या भारतामध्ये पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पेट्रोल-डिझेल आणि गॅस या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, या गोष्टींचा अमर्याद वापर आपल्याला करता येणार नाही. पुरवठा साखळीची परिस्थिती पाहता आणि परकीय चलन आपल्याला कसे वाचवता येईल, याकरिता पंतप्रधान मोदी यांनी केलेले आवाहन योग्य आहे. त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, अशी विनंती आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी यांनी मोदींच्या या आवाहनाचा एक्सवर पोस्ट करून चांगलाच समाचार घेतला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जनतेला त्याग करण्याचा उपदेश केला. सोने खरेदी करू नका, परदेशी जाऊ नका, पेट्रोल-डिझेलचा कमीत कमी वापर करा, रासायनिक खते आणि खाद्यतेलाचा स्वयंपाकात कमीत कमी वापर करा, मेट्रोने प्रवास करा,वर्क फ्रॉम होम करा, असे आवाहन मोदींनी केले. खरेतर मोदींचे हे आवाहन किंवा जनतेला केलेला उपदेश म्हणजे त्यांच्या बारा वर्षांच्या सत्ताकाळातल्या नाकर्तेपणाचा पुरावा आहे. मोदींनी 12 वर्षांत देशाला अशा टप्प्यावर आणून ठेवले आहे की,जनतेने काय खरेदी करावे, काय खरेदी करू नये, कुठे फिरायला जायचे , कुठे जाऊ नये हे सरकार सांगत आहे. मोदी दरवेळी सर्वसामान्य जनतेवर जबाबदारी टाकतात आणि स्वतः जबाबदारीपासून दूर पळतात. देश चालवणे हे आता तडजोड करणार्या पंतप्रधानांच्या आवाक्यात राहिलेले नाही.










