Konkan Mango-Cashew Growers’ March Today – बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने यावर्षी कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. काल यांवर सरकारशी झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुंबईत गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग आंबा व काजू बागायतदार व्यापारी महासंघाचे मुख्य प्रवक्ते गणेश गावकर यांच्याशी नवाकाळच्या गायत्री पोरजे यांनी चर्चा केली.
प्रश्न – कोकणातील हापूस उत्पादन घटत आहे.
उत्तर – गेल्या काही वर्षापासून आंबा उत्पादक कर्जात अडकत आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी गेल्या पन्नास वर्षात कधीच सरकारपुढे हात पसरले नव्हते. गेल्या वर्षी थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाला. थ्रिप्स हा कीटक आहे जो मिरचीवर जास्त प्रमाणात असतो आणि त्याचा आता आंब्यावरही हल्ला वाढायला लागले आहे. थ्रिप्स गेल्या वर्षी महागडी फवारणी करूनही नियंत्रणात आला नाही. त्याच्यामुळे ३० ते ३५ टक्के नुकसान झाले. पिवळ्या रंगाची फळमाशी असते. ती आंब्याला दंश करते आणि आंबा सडवून टाकते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याच्यावर कृषी विभागाने ट्रॅप बागेत लावण्याची सूचना दिली.परंतु त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा नाही. यावर्षी अतिप्रमाणात थंडी असल्यामुळे धुक्याचे प्रमाण वाढल्याने दवाचे प्रमाण वाढले. परिणामी मोहराला बुरशी झाली. औषधाचा उपाय झाला नाही आणि मोहोर करपून गेला आणि फळ आले नाही.
प्रश्न – यावर्षी किती नुकसान झाले ?
उत्तर – यावर्षीच्या हंगामात हवामानबदलामुळे कोकणातील आंबा – काजू या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या शेतकऱ्यांचे ९० टक्के तर अल्पभूधारक शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. आंब्याशिवाय काजू,सुपारी अशा सर्व उत्पादनाला फटका बसला आहे.
प्रश्न – मुंबईतील मोर्चात तुमच्या काय मागण्या असतील ?
उत्तर –आंबा उत्पादनाला १ हेक्टरी ५ लाख रुपये तर काजू उत्पादनाला हेक्टरी ३ लाख रुपये भरपाई मिळावी. म्हणजे आंब्याच्या एका कलमाला कमीत कमी ५ हजार आणि आणि काजूच्या एका कलमाला ३ हजार रुपये शासनाने दिले पाहिजे. कारण एका कलमाच्या मशागतीला जवळपास ५ हजार खर्च येतो . सरकारने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील चौदा जिल्ह्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कोकणातील जिल्ह्यांनाही कर्जमाफी दिली पाहिजे. नियमानुसार ३१ जून नंतर कर्ज थकीत होते.त्यानंतर शासनाची कर्जमाफी लागू होणार आहे. कोकणातील शेतकऱ्याचे कर्ज जास्त प्रमाणात थकित नसते. त्यामुळे आमचे चालू वर्षाचे कर्ज तरी माफ करावे .त्याचबरोबर उत्पादनाला योग्य हमीभाव मिळावा अशी आमची मागणी आहे.गोवा सरकार काजूला २०० रुपयांचा हमीभाव देते आहे तसाच निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावा.
प्रश्न – आतापर्यंतच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत का ?
उत्तर – शासनाने १३ एप्रिलला पंचनामे करण्यासाठी परिपत्रक काढले होते. महिनाभरात आजपर्यंत त्यांनी केवळ २५ टक्के पंचनामे पूर्ण केले आहेत. उर्वरित ६५ टक्के पंचनामे बाकी आहेत. अधिकाऱ्यांनी येत्या १० दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र एवढ्या कमी वेळात ते कसे पूर्ण होणार याबाबत आम्हाला प्रश्न आहे. त्यामुळे त्यासाठी शासनाने वेळ वाढवून द्यावी अशी आमची मागणी आहे.
प्रश्न – पीकविमा योजनेचा आंबा उत्पादकांना किती फायदा होतो ?
उत्तर – पीकविमा योजनेचा आंबा उत्पादकाला काहीच फायदा होत नाही. कारण त्या निकषांमध्ये कोकणातील आंबा – काजू उत्पादन बसत नाही. कोकणात उंच सखल भाग असल्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे. मात्र शेतकऱ्याचे नुकसान सगळीकडेच होते. त्यामुळे अनेक वेळा केवळ ५ हजार रुपयांचा पिकविमा मिळाल्याचे उदाहरण आहे.
प्रश्न – कोकणात फळ येण्याआधी बाग विकलेली असते. यामध्ये नुकसान नक्की कोणाचे होते?
उत्तर – काही लोक उत्पादन काढत नाही. त्या बागा ते वर्षाच्या करारावर व्यापाऱ्याला देतात. त्या व्यापाऱ्याने बागमालकाला पैसे पूर्ण दिलेले असतात. त्यामुळे त्यांना तोटा नाही. करार झाला की व्यापारी पिकाची मशागत करून काळजी घेतो. त्यांना फळ आले नाही तर प्रचंड नुकसान होते .
प्रश्न – हवामानबदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग संशोधन करतात का ?
उत्तर – बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत वेंगुर्ला , विजयदुर्ग येथे उपकेंद्र आहेत. पण पंधरा वीस वर्षात कोणतेच संशोधन केलेले नाही. आंब्यावर कोणतेही खास औषध किंवा कीटकनाशक नाही. आम्ही द्राक्ष, मिरची किंवा इतर फळांसाठी वापरले जाणारे किटकनाशक आंब्यावर वापरतो. शेतकरी जीवामृत, गोमुत्र असे सेंद्रिय उपाय करतात. पण ते १०० टक्के लागू होत नाही.काही लोकांकडे दहा हजार कलमाच्या बागा आहेत. त्यासाठीच्या सेंद्रिय फवारणीला वेळ पुरत नाही .
प्रश्न – उद्याच्या मोर्चाचे नियोजन कसे असणार आहे ?
उत्तर – काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री आणि पुनर्वसन मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचे आश्वासन देत मोर्चा न काढण्यास सांगितले. मात्र त्यांनी एका कलमाला २२० रुपये मदतीचा प्रस्ताव देऊन उत्पादकांची थट्टा केली . आम्ही गेल्या ३ महिन्यांपासून आंदोलन करत आहोत, मात्र सरकारने दाखल घेतली नाही.त्यांना आम्ही आज ११ वाजता पर्यंतची मुदत दिली होती. परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आम्ही मुंबईत मोर्चा काढणार आहोत . या आंदोलनासाठी आम्हाला उबाठा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, जनता दल, कम्युनिस्ट पक्ष या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आमच्या मोर्चाला परवानगी नाही. मात्र आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. दोन ते अडीच हजार आंदोलक यामध्ये सहभागी होणार आहेत. मोर्चानंतर सायंकाळी ५ वाजता शिवालय येथे पत्रकार परिषद होईल.












