Mumbai Watermelon Case : दक्षिण मुंबईतील पायधूनी परिसरात २६ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सुरुवातीला नैसर्गिक विषबाधा वाटणाऱ्या या प्रकरणाला आता ‘झिंक फॉस्फाइड’ (Zinc Phosphide) या जहाल विषारी रसायनाच्या समावेशामुळे वेगळे वळण मिळाले आहे. जे.जे. रुग्णालयाचा हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल आणि फॉरेन्सिक निष्कर्षांनंतर या मृत्यूचे गूढ अधिक गडद झाले असून, पोलिसांनी आता आपला तपास रसायनाच्या स्रोताकडे वळवला आहे.
यकृत आणि मूत्रपिंडाचा ‘हिरवट’ रंग ठरला मुख्य पुरावा
वैद्यकीय तपासादरम्यान मृतांच्या शरीराचे जे नमुने घेण्यात आले होते, त्यातून अत्यंत विदारक वास्तव समोर आले आहे. हिस्टोपॅथॉलॉजी अहवालानुसार, मृत व्यक्तींच्या यकृत (Liver) आणि मूत्रपिंडाच्या (Kidney) अंतर्गत भागाला एक विशिष्ट प्रकारचा ‘हिरवट’ रंग प्राप्त झाला होता. वैद्यकीय शास्त्रानुसार, मानवी अवयवांचा असा रंग होणे हे ‘झिंक फॉस्फाइड’ या विषबाधेचे प्रमुख लक्षण मानले जाते. या रसायनाचा अंश केवळ मृतांच्या शरीरातच नव्हे, तर त्यांनी सेवन केलेल्या कलिंगडाच्या अवशेषांमध्येही आढळून आला आहे.
मिठाच्या बरणीत विषाचा अंश?
या प्रकरणात आता सर्वात मोठा ‘ट्विस्ट’ समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलिंगडावर मीठ लावून खाण्याची या कुटुंबाची पद्धत होती. त्यामुळे घरातील मिठाच्या नमुन्यांमध्ये हे विष मिसळले गेले होते का, याचा संशय बळावला आहे. पोलिसांनी घरातील मिठाचे सर्व नमुने जप्त करून ‘फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी’ (FSL) कडे तपासणीसाठी पाठवले आहेत. विशेष म्हणजे, घरात किंवा परिसरात कुठेही झिंक फॉस्फाइडची पावडर किंवा डबी सापडलेली नाही. त्यामुळे हे विष कलिंगडापर्यंत किंवा मिठापर्यंत पोहोचले कसे, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पायधूनी पोलिसांसमोर आहे.
मृत्यूचा ‘तो’ थरार आणि वैद्यकीय गुंतागुंत
२५ एप्रिलच्या रात्री डोकाडिया कुटुंबाने एकत्र बसून कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही वेळातच पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींना तीव्र मळमळ, उलट्या, चक्कर येणे आणि पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. २६ एप्रिलच्या सकाळी दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एकामागून एक अशा चारही सदस्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूंचा वेग आणि विषबाधेची तीव्रता इतकी भीषण होती की, डॉक्टरांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकाची नियुक्ती
केवळ रासायनिक अहवालावर अवलंबून न राहता, जे.जे. रुग्णालयाने न्यायवैद्यक शास्त्र विभागातील (Forensic Department) तज्ज्ञांचे एक विशेष पथक नियुक्त केले आहे. हे पथक मृतांची वैद्यकीय पार्श्वभूमी, विषबाधेची लक्षणे आणि रसायनाचा शरीरावर झालेला परिणाम यांची सविस्तर सांगड घालणार आहे. ही विषबाधा अपघाती होती, की त्यामागे काही घातपात होता, या दिशेने आता पोलीस तपास करत आहेत.










