Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, जागावाटप आणि उमेदवारीवरून महायुतीमध्ये खलबते सुरू आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विप्लव बाजोरिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा येत्या २४ तासांत होण्याची शक्यता आहे.
बाजोरिया पिता-पुत्रांची ‘फिल्डिंग’ आणि गाठीभेटी-
विप्लव बाजोरिया यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असल्याने उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, बाजोरिया यांनी मुंबईत महायुतीतील दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मंगळवारी विप्लव बाजोरिया यांनी त्यांचे वडील आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ‘देवगिरी’ या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.
विशेष म्हणजे, गोपीकिशन बाजोरिया यांनी स्वतःसाठी भाजपकडे असलेल्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे या जागेसाठी आग्रह धरला असून, अमरावतीतून आपल्याला काँग्रेसच्या नगरसेवकांचेही समर्थन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गोपीकिशन बाजोरिया यांनी यापूर्वी अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघाचे सलग तीनवेळा नेतृत्व केले आहे.
पुणे मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये ‘रस्सीखेच’-
दुसरीकडे, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावरून महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष—भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस—यांच्यात तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला हक्क सांगितला आहे. यापूर्वी या जागेवरून राष्ट्रवादीचे अनिल भोसले निवडून आले होते, हाच आधार घेत पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन, पुणे जिल्ह्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याचा दावा केला आहे. या जागेसाठी माजी आमदार विलास लांडे, योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे आणि भाऊसाहेब भोईर हे इच्छुक असून, पिंपरी-चिंचवडला यंदा प्रतिनिधित्व मिळावे, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.
संख्याबळाचे समीकरण: कुणाचे पारडे जड?
पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचे संख्याबळ पाहता महायुतीची स्थिती भक्कम दिसत असली, तरी उमेदवारीवरून पेच कायम आहे. जिल्ह्यातील राजकीय बलाबल खालीलप्रमाणे आहे:
| पक्ष | प्रतिनिधी संख्या |
| राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) | ३४४ ते ३४८ |
| भारतीय जनता पक्ष | ३०६ ते ३१९ |
| शिवसेना (एकनाथ शिंदे गट) | ६८ |
| काँग्रेस | १९ |
| राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) | १७ |
| शिवसेना (उद्धव ठाकरे गट) | ११ |










