Pune Crime Andekar Gang : विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात आंदेकर आणि कोमकर टोळीतील वर्चस्वाच्या लढाईने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी सुरू असलेल्या या रक्तरंजित संघर्षात बुधवारी सकाळी बालाजीनगर परिसरात भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील एका आरोपीच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातील हा चौथा खून असून, यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सूडाच्या चक्रातून रक्ताचा सडा-
या टोळीयुद्धाची मुळे २०२५ मध्ये घडलेल्या वनराज आंदेकर यांच्या हत्येत दडलेली आहेत. पुण्यातील गणेशपेठ परिसरात वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येचा कट वनराज यांच्याच बहिणीने आणि मेहुण्याने रचल्याचे निष्पन्न झाले होते. आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी टोळीप्रमुख बंडू आंदेकर याने तेव्हापासून कोमकर टोळीतील सदस्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वीच वनराजच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याची घराबाहेर हत्या करण्यात आली होती, त्यानंतर कात्रज-घोलेवाडी भागात शिंदे नावाच्या व्यक्तीचा बळी घेण्यात आला. आजची घटना ही त्याच साखळीतील पुढील कडी असल्याचे मानले जात आहे.
तुरुंगातून हलतात गुन्हेगारीची सूत्रे
आंदेकर टोळीचे नेतृत्व करणारा बंडू आंदेकर, त्याची मुलगी आणि सून सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र, आजच्या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, कारागृहाच्या भिंती बंडू आंदेकर याला आपली गुन्हेगारी सूत्रे हलवण्यापासून रोखू शकलेल्या नाहीत. तुरुंगात असूनही त्याने आपल्या हस्तकांमार्फत या हत्येचा कट अत्यंत नियोजनबद्धरीतीने अमलात आणला. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, आंदेकर टोळीने ही हत्या घडवून आणण्यासाठी पुन्हा एकदा कमी वयाच्या तरुणांचा ‘शूटर’ म्हणून वापर केला आहे, जे पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.
राजकीय पार्श्वभूमी आणि पोलीस कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
आंदेकर कुटुंबाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. टोळीतील सदस्यांनी, विशेषतः महिलांनी तुरुंगात असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुका लढवून विजय मिळवला होता. गुन्हेगारी आणि राजकारण यांच्या या साट्यालोट्यामुळे आंदेकर टोळीचे वर्चस्व अद्याप कायम असल्याचे दिसून येते. शहरात एकामागून एक खून होत असताना पुणे पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. भरवस्तीत झालेला हा गोळीबार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.










