Team India Next Captain : भारतीय क्रिकेट सध्या अतिशय सुवर्णकाळातून जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने नुकतेच 2026 मधील आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. मात्र, सूर्यकुमार आता 35 वर्षांचा झाला असून वैयक्तिक कामगिरीतही काहीसा चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत, आगामी 2026-28 च्या टी-20 सायकलसाठी भारतीय निवड समिती एका युवा आणि अनुभवी नेतृत्वाचा शोध घेत आहे.
या शर्यतीत कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांची नावे चर्चेत असतानाच, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याचे नाव आता सर्वांत पुढे येत आहे. श्रेयस अय्यरला नुकतेच एकदिवसीय संघात शुभमन गिलचा उपकर्णधार बनवून त्याच्या नेतृत्वगुणावर विश्वास दाखवण्यात आला आहे.
दिग्गज रिकी पाँटिंगचा श्रेयसला पाठिंबा
आयपीएल 2026 चा मोसम अंतिम टप्प्यात आला असून जूनच्या उत्तरार्धात भारताचा आयर्लंड आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांचा टी-20 दौरा होणार आहे. या दौऱ्यापूर्वी भारताच्या नवीन टी-20 कर्णधाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाला दोनदा विश्वचषक जिंकवून देणारे रिकी पाँटिंग यांनी श्रेयस अय्यरच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
रिकी पाँटिंग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, माझ्या मते भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर हा सर्वात मुख्य दावेदार आहे. तो त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधी नव्हता एवढा परिपक्व आणि समजूतदार खेळाडू बनला आहे. सध्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्याचे स्वतःच्या खेळावर आणि रणनीतीवर पूर्ण नियंत्रण आहे.
२६.७५ कोटींची बोली आणि यशस्वी प्रवास
श्रेयस अय्यरने 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला तिसरे आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर 2025 च्या लिलावात पंजाब किंग्सने त्याला तब्बल 26.75 कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात घेतले. पाँटिंग आणि अय्यरच्या जोडीने 2025 मध्ये पंजाबला गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचवले होते, मात्र अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
निर्णायक सामन्यात पुनरागमनाचा विश्वास
आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत सर्व 14 सामन्यांमध्ये सातत्य राखणे कठीण असते, असे पाँटिंग यांचे मानणे आहे. प्रत्येक खेळाडूच्या आणि संघाच्या आयुष्यात असे चढ-उतार येतात. मात्र, श्रेयस अय्यर या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत लखनऊविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करेल आणि संघाला विजय मिळवून देईल, असा ठाम विश्वास पाँटिंग यांनी व्यक्त केला आहे. त्याची हीच नेतृत्वक्षमता त्याला भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यासाठी पुरेशी आहे.
हे देखील वाचा – Cockroach Janta Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नक्की काय आहे? कोणी केली या पक्षाची स्थापना? जाणून घ्या










