Home / महाराष्ट्र / SBI Bank Closed : बँकेची कामे खोळंबणार, आजच आटपून घ्या! उद्यापासून सलग ६ दिवस SBI बँक बंद; वीकेंड, संप आणि ईदच्या सुट्ट्यांमुळे व्यवहार ठप्प!

SBI Bank Closed : बँकेची कामे खोळंबणार, आजच आटपून घ्या! उद्यापासून सलग ६ दिवस SBI बँक बंद; वीकेंड, संप आणि ईदच्या सुट्ट्यांमुळे व्यवहार ठप्प!

SBI Bank Closed : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना...

By: Team Navakal
SBI Bank Closed 
Social + WhatsApp CTA

SBI Bank Closed : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. बँकिंग व्यवहारांशी संबंधित प्रलंबित कामे ग्राहकांनी आजच, म्हणजेच २२ मे रोजी पूर्ण करून घेणे हिताचे ठरेल, कारण उद्यापासून पुढील सहा दिवस बँकांचे कामकाज विस्कळीत राहण्याची चिन्हे आहेत. २३ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत शनिवार-रविवारची साप्ताहिक सुट्टी, कर्मचाऱ्यांचा नियोजित दोन दिवसांचा संप आणि बकरी ईद निमित्त जाहीर झालेली सार्वजनिक सुट्टी यामुळे बँकांच्या शाखांमधील प्रत्यक्ष कामकाज बंद राहू शकते.

या दीर्घ सुट्ट्यांची सुरुवात २३ मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार आणि २४ मे रोजी येणाऱ्या रविवारपासून होत आहे. नियमानुसार या दोन्ही दिवशी बँकांचे कामकाज बंद असते. त्यानंतर, सोमवार २५ मे आणि मंगळवार २६ मे रोजी ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी संपाचे हत्यार उपसले आहे. हा संप प्रामुख्याने लिपिक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा असल्याने रोख रकमेचे व्यवहार, चेक क्लिअरिंग आणि पासबुक अपडेट यांसारख्या सेवांना मोठा फटका बसू शकतो. संपाच्या या दोन दिवसांनंतर लगेचच २७ आणि २८ मे रोजी रिझर्व्ह बँकेने बकरी ईदनिमित्त सुट्ट्या निश्चित केल्या आहेत. जम्मू-काश्मीरसारख्या काही राज्यांमध्ये या दोन्ही दिवशी बँका बंद राहतील, तर उर्वरित देशात स्थानिक परिस्थितीनुसार २७ किंवा २८ तारखेला शाखांचे कामकाज बंद असेल.

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामागे एकूण १६ प्रमुख मागण्यांचे पत्र प्रशासनाला देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि सशस्त्र सुरक्षा रक्षकांची तातडीने कायमस्वरूपी भरती करणे, कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या ‘आउटसोर्सिंग’ला पूर्णपणे आळा घालणे आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या धोरणांचे पुनरावलोकन करणे या मागण्यांचा समावेश आहे. तसेच, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मधील कर्मचाऱ्यांना फंड मॅनेजर निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन गणनेत सुधारणा व्हावी, यांसारख्या आर्थिक सुरक्षा पुरवणाऱ्या मुद्द्यांकडेही फेडरेशनने लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, विमा आणि म्युच्युअल फंड विक्रीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांवर टाकला जाणारा दबाव आणि त्यातून होणारी ग्राहकांची फसवणूक (Mis-selling) थांबवण्याची मागणीही कर्मचारी संघटनेने केली आहे.

बँक शाखांमधील कामकाज जरी बंद राहणार असले, तरी ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. स्टेट बँकेच्या डिजिटल सेवा या काळात अविरत सुरू राहतील. एटीएमद्वारे रोख रक्कम काढणे, ‘योनो’ (YONO) ॲपचा वापर करणे, नेट बँकिंगद्वारे निधी हस्तांतरण (NEFT, RTGS) आणि यूपीआय आधारित डिजिटल पेमेंट सुविधा नेहमीप्रमाणे कार्यरत असतील.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या