Home / देश-विदेश / CJP Protest LIVE : इतिहासात पहिल्यांदाच पोलीस ठाण्याची पायरी न चढता मंजुरी! व्हॉट्सॲपवर परवानगी मिळताच अभिजित दिपके थेट जंतर-मंतरवर दाखल

CJP Protest LIVE : इतिहासात पहिल्यांदाच पोलीस ठाण्याची पायरी न चढता मंजुरी! व्हॉट्सॲपवर परवानगी मिळताच अभिजित दिपके थेट जंतर-मंतरवर दाखल

CJP Protest LIVE : दुपारी : 12:00‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त-दिल्लीतील...

By: Team Navakal
CJP Protest LIVE
Social + WhatsApp CTA

CJP Protest LIVE :

दुपारी : 12:00
‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त-
दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या महाराष्ट्रातील निवासस्थानी पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. अभिजित दिपके यांचे मूळ निवासस्थान छत्रपती संभाजीनगर शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूज परिसरात आहे. दिल्लीतील तीव्र आंदोलनानंतर आणि त्यांच्या वाढत्या राजकीय सक्रियतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

अभिजित दिपके हे आगामी काही दिवसांत दिल्लीहून आपल्या मूळ गावी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर येथे परतण्याची शक्यता आहे. ते शहरात दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांची, आंदोलक विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, सद्यस्थितीतील राजकीय तणाव पाहता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये आणि त्यांच्या कुटुंबाला पूर्ण संरक्षण मिळावे, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही तात्कालिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी अभिजित दिपके यांच्या वाळूज येथील घराबाहेर सुरक्षेसाठी केवळ एकच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. परंतु, बदलत्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आता पोलीस खात्याने या संरक्षणात लक्षणीय वाढ केली आहे. नव्या बंदोबस्तानिसार आता त्यांच्या घराबाहेर चोवीस तास एका पोलीस अधिकाऱ्यासह एकूण १० पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तैनात तैनात करण्यात आले आहे.


सकाळी 11:00 –
देशातील परीक्षा पद्धतीतील कथित गैरव्यवहार आणि ‘पेपर फुटी’च्या गंभीर प्रकरणांमुळे संतप्त झालेल्या युवा वर्गाचे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक आणि युवा नेते अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलक एकत्र येत आहेत. राष्ट्रीय परीक्षांमधील कथित त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याचा आरोप करत, आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांकडून शिक्षण मंत्र्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली जात असून संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला आहे.

काही दिवसांपूर्वीच समाजमाध्यमांवरून सुरू झालेल्या आणि अल्पावधीतच देशभरातील तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या उपरोधिक राजकीय चळवळीचे (Satirical Movement) रूपांतर आता थेट जनआंदोलनात झाले आहे. या आंदोलनासाठीअभिजित दिपके दिल्लीत दाखल होताच, त्यांनी थेट जंतर-मंतर येथे पोहोचून आंदोलनाला सुरवात केली आहे. जंतर-मंतर येथील या वाढत्या तणावाच्या आणि घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


सकाळी 9:50 –
राष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या प्रकरणांवरून केंद्र सरकारला धारेवर धरण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके हे अखेर आपल्या समर्थकांसह दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. व्हॉट्सॲपवर प्रशासकीय परवानगी मिळताच, कोणतीही वेळ वाया न घालवता दीपके यांनी थेट जंतर-मंतर मैदान गाठले. विशेष म्हणजे, या पहिल्या जाहीर आंदोलनाला अधिकृत आणि पद्धतशीर स्वरूप देण्यासाठी पक्षाचे तीन मुख्य प्रवक्ते देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.

राष्ट्रीय राजधानीतील राजकीय आंदोलनांच्या इतिहासात आज एक अत्यंत वेगळी घटना पाहायला मिळाली. देशातील प्रमुख परीक्षांमधील गैरव्यवहारांविरोधात जंतर-मंतर येथे निदर्शने करू पाहणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (CJP) दिल्ली पोलिसांकडून थेट ‘व्हॉट्सॲप’ (WhatsApp) या मेसेजिंग ॲपवर आंदोलनाची अधिकृत परवानगी मिळाली आहे. प्रशासकीय पातळीवर अशा प्रकारे थेट डिजिटल माध्यमातून संवेदनशील आंदोलनाला परवानगी देण्याची ही पहिलीच वेळ आहे, या अभिनव आणि काहीशा अनपेक्षित कार्यपद्धतीमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

दीपके यांना नेत्याला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, पोलीस प्रशासनाने व्हॉट्सॲप संदेशाद्वारेच त्यांना ही अनुमती सुपूर्द केली. अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या जंतर-मंतर परिसरातील आंदोलनाला इतक्या सहजतेने डिजिटल मंजुरी कशी मिळाली, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रशासकीय सुलभता की नियमांना बगल?
अशा संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या आंदोलनांसाठी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात कागदपत्रांची पडताळणी होणे, हमीपत्र लिहून घेणे ही आजवरची कायदेशीर पद्धत राहिली आहे. या प्रक्रियेला बगल देऊन केवळ एका संदेशावर परवानगी देणे, हे भविष्यात सुरक्षेच्या दृष्टीने किती योग्य ठरेल, अशी रास्त शंका उपस्थित केली जात आहे. केवळ विशिष्ट पक्षासाठीच ही डिजिटल सवलत आहे की सर्वसामान्य नागरिकांसाठीही पोलीस हीच तत्परता दाखवणार, असा तटस्थ आक्षेपही घेतला जात आहे.


विद्यार्थी आंदोलनाकडे मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्यांचे दुर्लक्ष; संवेदनशील मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न?
देशातील परीक्षा पद्धतीतील त्रुटी आणि ‘पेपर फुटी’च्या गंभीर प्रकरणावरून गेल्या काही दिवसांत देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरुवातीच्या काळात अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक वृत्तवाहिन्यांनी या विषयावर सातत्याने बातम्या प्रसारित केल्या आणि स्वतःचे टीआरपी रेटिंग वाढवून घेतले. मात्र, आज जेव्हा या अन्यायाविरोधात देशभरातील हजारो विद्यार्थी संघटित होऊन राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक ‘जंतर-मंतर’ मैदानावर भव्य आंदोलनासाठी जमले आहेत, नेमक्या याच महत्त्वाच्या क्षणी मुख्य प्रवाहातील अनेक वृत्तवाहिन्यांनी या आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचा आवाज दिल्लीत घुमत असताना, राष्ट्रीय पातळीवरील अनेक वृत्तवाहिन्यांवर मात्र या आंदोलनाऐवजी इतर दुय्यम आणि प्रादेशिक मुद्द्यांना अवाजवी महत्त्व दिले जात आहे. काही वाहिन्यांवर तामिळनाडूतील स्थानिक राजकीय घडामोडींचे विश्लेषण सुरू आहे, तर काही वाहिन्या शेजारील देशांच्या संदर्भाने किंवा पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संबंधित राजकीय समीकरणांवर चर्चा घडवून आणण्यात व्यस्त आहेत. वास्तविक पाहता, देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि रोजगाराशी निगडित असलेल्या या राष्ट्रीय आंदोलनाला प्राधान्य देणे गरजेचे होते. परंतु, यातलं काहीच होताना दिसत नाही आहे.

दिल्लीमध्ये एरवी एखादी लहानशी किंवा क्षुल्लक राजकीय घडामोड घडल्यास त्याचा दिवसभर गाजावाजा करणाऱ्या आणि दिवसभर ‘ब्रेकिंग न्यूज’ चालवणाऱ्या या वृत्तवाहिन्यांनी, आज एवढ्या मोठ्या जनआंदोलनावेळी मात्र ‘मू गिळून गप्प’ राहण्याची भूमिका घेतली आहे.


कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखालील नियोजित आंदोलनाला दिल्ली पोलिसांकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. प्रशासनाने जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्याची अनुमती दिली आहे. अभिजित दीपके आता थेट जंतर-मंतर मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

पोलीस प्रशासनासोबतची चर्चा यशस्वी-
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी काही अटी व शर्तींसह या आंदोलनाला हिरवा कंदील दाखवला आहे. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन दीपके यांनी परवानगी मिळाल्यानंतर केले.



अभिजित दीपके यांच्या भूमिकेवर काकांकडून खंत; जंतर-मंतरवर पोलिसांचा कडक पहारा
अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल होऊन आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या दीपके यांनी या संपूर्ण आंदोलनादरम्यान कौटुंबिक नातेसंबंधांना पूर्णपणे बाजूला ठेवल्याचे समोर आले आहे. काका माध्यमांशी बोलताना भावुक झाले खरे, परंतु त्यांच्या शब्दांतून अभिजित यांच्या या अनाकलनीय आणि एकाकी कार्यपद्धतीबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

मायबाप आणि भावालाही ठेवले अनभिज्ञ; काकांची खंत-
“अभिजित दिल्लीत आंदोलनासाठी येत असल्याची माहिती मिळताच आम्ही चिंतेपोटी त्यांना वारंवार फोन केले. परंतु, त्यांनी आमच्या एकाही फोनला उत्तर दिले नाही,” असे सांगताना त्यांच्या काकांनी आपली खंत व्यक्त केली. “त्याने कुटुंबातील कोणालाच बोलावले नाही. किमान त्याने हक्काने साद घातली असती, तर त्याचा भाऊ आणि मी स्वतः त्याच्यासोबत तिथे खंबीरपणे उभे राहिलो असतो,” अशा शब्दांत काकांनी खंत व्यक्त केली.

सुरक्षेसाठी जंतर-मंतर परिसरात २ हजार पोलीस तैनात-
दुसऱ्या बाजूला, या आंदोलनाची संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांचा वाढता रोष लक्षात घेता, दिल्ली प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड मोठी वाढ केली आहे. जंतर-मंतर आणि पार्लियामेंट स्ट्रीट परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी तब्बल २,००० पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


देशातील विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या प्रकरणांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या राजकीय संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, आज दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर पक्षाच्या वतीने पहिल्या जाहीर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे शनिवारी सकाळी ठीक ७:४५ वाजता अमेरिकेहून थेट दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत.

विमानतळावरून ते थेट पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे रवाना झाले असून, तिथे ते जंतर-मंतरवरील नियोजित आंदोलनासाठी रीतसर कायदेशीर परवानगी घेणार आहेत. दीपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे आंदोलनाची पुढील रूपरेषा निश्चित केली जाईल. विमानतळावरून जाताना अभिजित दिपके यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक देखील होते.

आंदोलनाचा मुख्य हेतू आणि मागण्या-
हे आंदोलन विशेषतः देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या प्रमुख परीक्षांमधील भ्रष्टाचाराविरोधात पुकारण्यात आले आहे. पक्षाने प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर केंद्र सरकारला धारेवर धरले आहे:

NEET-UG पेपरफुटी प्रकरण: वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित गोपनीयता भंगाची सखोल चौकशी व्हावी.

इतर परीक्षांमधील गैरव्यवहार: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (CUET), आणि कर्मचारी निवड आयोग – सामान्य कर्तव्य (SSC-GD) या परीक्षांमध्ये झालेल्या कथित अनियंत्रित कारभाराचा तीव्र निषेध.

केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: या सर्व प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी पक्षाने केली आहे.

कार्यकर्त्यांसाठी ‘८ कलमी’ नियमावली आणि मार्गदर्शक सूचना-
आंदोलन शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि प्रभावी व्हावे यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आपल्या समर्थकांसाठी एक विशेष मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन) जाहीर केली आहे. यामध्ये कार्यकर्त्यांना पुढील ८ महत्त्वपूर्ण आवाहने करण्यात आली आहेत:

१. आरोग्याची काळजी: कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सर्वांनी घराबाहेर पडताना ‘सनस्क्रीन’ लावून यावे.
२. आहाराची पूर्वतयारी: आंदोलन दीर्घकाळ चालण्याची शक्यता असल्याने सर्व समर्थकांनी घरातूनच व्यवस्थित न्याहारी (नाश्ता) करून यावे.
३. राष्ट्रीय अस्मिता: प्रत्येकाच्या हातात सन्मानाने फडकणारा भारताचा ‘तिरंगा’ ध्वज असावा.
४. शांततेचे प्रतीक: आंदोलनात सकारात्मकता राखण्यासाठी समर्थकांनी सोबत फुले आणावीत.
५. ज्ञानाचा संदेश: शिक्षणाच्या हक्कासाठीचे हे आंदोलन असल्याने प्रतीकात्मक स्वरूपात हातात ‘पुस्तक’ बाळगावे.
(याशिवाय आंदोलनातील शिस्त राखणे, कायदे पाळणे आणि शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवणे अशा एकूण आठ नियमांचे पालन करण्याचे बंधन कार्यकर्त्यांवर घालण्यात आले आहे.)

( टीप : बातमी अपडेट होत राहील)

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या