CBSE Cyber Attack: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता 12 वीच्या निकालांनंतर एक मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी लाखो विद्यार्थ्यांनी वापरलेल्या सीबीएसईच्या अधिकृत पोर्टलवर अत्यंत नियोजनबद्ध आणि गंभीर सायबर हल्ला करण्यात आला आहे.
या मोठ्या सायबर हल्ल्यानंतर सीबीएसईने थेट दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सायबर पथकाकडे (IFSO) या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.
CBSE Cyber Attack: पुनर्मूल्यांकनाच्या काळातच झाला हल्ला
विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचे असतानाच हॅकर्सनी याला आपले लक्ष्य बनवले:
- हल्ल्याची वेळ: सीबीएसईने 2 जून रोजी गुण पडताळणीसाठी हे पोर्टल सुरू केले होते. त्यानंतर सलग 3 दिवस या प्लॅटफॉर्मवर एकामागून एक सायबर हल्ले झाले.
- हल्ल्याचे स्वरूप: भारतासह परदेशातील अनेक वेगवेगळ्या आयपी अड्रेसचा वापर करून या वेबसाईटवर अचानक ट्रॅफिक वाढवण्यात आले.
- मुख्य उद्देश: बोर्डाच्या मते, या हल्ल्याचा मुख्य उद्देश वेबसाईट ठप्प करणे, सामान्य विद्यार्थ्यांना त्याचा वापर करण्यापासून रोखणे आणि गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न करणे हाच होता. बोर्डाने या कृत्याला देशहिताच्या विरोधात काम करणाऱ्या घटकांचे कृत्य म्हटले आहे.
CBSE Cyber Attack: भारतीय हॅकरचा बोर्डाला अजब सल्ला
या संपूर्ण सायबर गोंधळानंतर सोशल मीडियावर एका भारतीय तरुण हॅकरची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. सार्थक सिद्धांत या प्रसिद्ध तरुण एथिकल हॅकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सीबीएसईला एक अगदी साधा आणि मजेशीर सल्ला दिला आहे.
त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “फक्त क्लाउडफ्लेअर वापरा भाऊ”. क्लाउडफ्लेअर ही जगातील एक प्रसिद्ध सायबर सुरक्षा आणि वेब इन्फ्रास्ट्रक्चर सेवा आहे, जी वेबसाईट सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अचानक येणारे सायबर हल्ले किंवा बोगस ट्रॅफिक रोखण्यासाठी वापरली जाते.
CBSE Cyber Attack: विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित; बोर्डाचा दावा
या सायबर हल्ल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा डेटा चोरीला गेल्याची भीती व्यक्त केली जात होती, परंतु सीबीएसईने ही भीती पूर्णपणे फेटाळून लावली आहे.
बोर्डाने स्पष्ट केले आहे की, आमच्या सुरक्षा यंत्रणेने आणि डेटाबेसने हा हल्ला यशस्वीरित्या मोडून काढला आहे. कोणत्याही विद्यार्थ्याची माहिती चोरीला गेलेली नाही किंवा सिस्टीमशी छेडछाड झालेली नाही. या कठीण काळात आयआयटी कानपूर, आयआयटी मद्रास, डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन आणि इतर केंद्रीय सायबर सुरक्षा यंत्रणांच्या तज्ञांनी २४ तास देखरेख ठेवून हे पोर्टल सुरक्षित ठेवले आहे. आता या गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बोर्डाने केली आहे.
हे देखील वाचा – CJP Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे आंदोलन; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कार्यकर्त्यांना नियमावली










