Home / महाराष्ट्र / Worli NSCI Dome : मुंबईत पुन्हा ‘नेस्को’सारखीच घटना…. वरळी डोमच्या कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, तरुणी अत्यवस्थ

Worli NSCI Dome : मुंबईत पुन्हा ‘नेस्को’सारखीच घटना…. वरळी डोमच्या कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, तरुणी अत्यवस्थ

Worli NSCI Dome – गोरेगावच्या Nesco Center लाईव्ह कन्सर्टमध्ये अमली पदार्थ सेवनामुळे एका मुलाचा आणि एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना...

By: Team Navakal
Worli NSCI Dome
Social + WhatsApp CTA

Worli NSCI Dome – गोरेगावच्या Nesco Center लाईव्ह कन्सर्टमध्ये अमली पदार्थ सेवनामुळे एका मुलाचा आणि एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता वरळीतील NSCI डोम येथे झालेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये आणखी एक गंभीर घटना घडली आहे. या कार्यक्रमादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला असून एका तरुणीला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

वृषभ गांगुर्डे (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या मित्रांसोबत concert चा आनंद घेण्यासाठी आला होता. कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्याच वेळी वृषभ याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच तो खाली कोसळला. उपस्थितांनी आणि आयोजकांनी तात्काळ त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात हलवले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याच कार्यक्रमातील प्रिया रे या तरुणीचीही प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

गोरेगाव येथील नेस्को मैदानात झालेल्या कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या सेवनामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. तसेच संबंधित भागातील स्थानिक उपायुक्तांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, आता वरळीतील एनएससीआय डोममध्ये पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली करत एनएससीआय डोम आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. प्राथमिक तपासानुसार, वृषभ गांगुर्डे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेनंतर एनएससीआय डोम परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून उपस्थितांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी ८ ते १० जणांची चौकशी करण्यात आली. स्पेसबाऊंड या कंपनीने या कॉन्सर्टचे आयोजन केलं होतं. पोलिसांनी स्पेसबाऊंड कंपनीच्या आयोजकांची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्याचे पुरावे सापडले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, या कॉन्सर्टसाठी सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही नंतर परवानगी कशी देण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच कार्यक्रमात मद्यपानासाठी परवानगी होती का आणि इतर नियमांचे पालन झाले का, याचीही चौकशी सुरू आहे. आयोजकांसह काही जणांची सखोल चौकशी केली जात आहे. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून, मृत तरुण वृषभच्या प्रकरणात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपासात गुन्हा दाखल करता येईल का, याबाबत पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या राज्यात आणि देशात ‘नो टॉलरन्स फॉर ड्रग्स’ ही मोहीम राबवली जात आहे. मोठ्या प्रमाणावर गुप्त माहिती (इंटेलिजन्स) गोळा करून त्याच्या आधारे कारवाया केल्या जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत ड्रग्सच्या जाळ्याची पाळेमुळे उपटून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळातही या कारवाया सातत्याने सुरूच राहतील.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वरळी डोममधील कॉन्सर्टमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणासंदर्भात पोलीस चौकशी करत आहेत. याप्रकरणी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करतील.

डार्कसाईट काय?

या कॉन्सर्टसाठी एन्ट्री फि मजबूत ठेवण्यात आली होती, अशी माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीला ४ हजार रुपये इतका तिकिटाचा दर ठेवण्यात आला होता, अशी माहिती आहे. तर या घटनेनंतर एसएससीई क्लबचे सदस्य सुरेंद्र दुग्गल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुरेंद्र दुग्गल म्हणाले की, मी एनएससीई चा मेंबर आहे, काल इथली परिस्थिती भयानक होती. मोठ्या प्रमाणावर तरुणाई येथे जमली होती. हा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी अनेक तरुण शुद्धीत नसतात. अशा वेळी घडलेल्या प्रकारासाठी मॅनेजमेंटला दोषी धरले पाहिजे. याचबरोबर पोलिसांनी त्यांना परवानगी दिलीच कशी? असा सवालही उपस्थित होत आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या