BCCI Allows Vaibhav Suryavanshi’s Parents to Join Ireland and England Tours – अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या वैभवच्या आई-वडिलांना आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांवर त्याच्यासोबत जाण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या संघात वैभव सूर्यवंशीची आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकांसाठी तसेच वर्षाअखेरीस होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली.
तो भारतीय संघात स्थान मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकत असताना वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी आणि आई आरती सूर्यवंशी त्याच्यासोबत परदेश दौऱ्यावर असतील. सर्वोच्च स्तरावरील क्रिकेटमध्ये पदार्पण करताना कुटुंबाचा आधार मिळावा. या उद्देशाने बीसीसीआयने वैभव केवळ १५ वर्षांचा असल्याने त्याला विशेष परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
वैभव सध्या तो भारत ‘अ’ संघासोबत श्रीलंकेत होणार्या त्रिकोणी मालिकेची तयारी करत आहे. भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी संघ जाहीर करताना सांगितले की, वैभवने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळवले आहे. त्याच्यात प्रचंड क्षमता असून आगामी काळात त्याच्यासमोर मोठी आव्हाने असतील. मात्र त्याने आतापर्यंत दाखवलेला संयम आणि गुणवत्ता आशादायक आहे.
वैभवच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. त्याची आई आरती सूर्यवंशी त्याच्या सरावाचे वेळापत्रक, आहार आणि दैनंदिन तयारीची जबाबदारी सांभाळत आली आहे. तर वडील संजीव सूर्यवंशी यांनी मुलाच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी मोठा त्याग केला. सराव आणि स्पर्धांसाठी त्यांनी अनेकदा शेकडो किलोमीटरचा प्रवास केला, तसेच आवश्यक खर्च भागवण्यासाठी वैयक्तिक त्यागही केला.
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी मानसिक बळ मिळणार असल्याची भावना क्रिकेट वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.










