Pre-Monsoon Rainstorm : राज्यात आज मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. पुणे, सातारा, जळगाव आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वार्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे फळबागा, भाजीपाला आणि इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि रस्त्यावर पाणी साचणे अशा घटनांमुळे जनजीवनही विस्कळीत झाले. राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यामुळे 24 जिल्ह्यांतील 1 लाखाहून अधिक एकर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सातारा, पुणे, जळगाव आणि परभणी जिल्ह्यांना या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. सातारा जिल्ह्यात अचानक हवामानात बदल होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाई तालुक्यातील भुईंज आणि जोशी विहीर परिसरात पावसाचा जोर इतका होता की, काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या कोसळल्या. जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात नुकत्याच लागवड करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो पिकांना मोठा फटका बसल्याची माहिती आहे. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाटा परिसरात सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कार अडकून पडली होती. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत जीप आणि पिकअपच्या सहाय्याने तिला सुरक्षित बाहेर काढले. भोर तालुक्यात दिवळे गावात घरावरचे पत्रे उडाले. त्यामुळे साठवलेले कांदे, धान्य भिजले. बारामती तालुक्यात वादळी पावसामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती परिसराला भेट दिली. त्यांनी अधिकार्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देत शेतकर्यांना शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन दिले. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याचे पत्रे आणि लोखंडी अँगल वादळी वार्यामुळे उडून कोसळले. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव टोल नाक्यावरील दोन मार्गिका तात्पुरत्या बंद केल्या. परभणी जिल्ह्यातही सोसाट्याच्या वार्याने दाणादाण उडवली. पूर्णा तालुक्यातील पूर्णा झिरो फाटा मार्गावर झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. माटेगाव ते लक्ष्मणनगर पाटी मार्गावर चक्रीवादळासारखे तीव्र वारे वाहिल्याने अनेक झाडे उन्मळून पडली आणि हा मार्गही काही काळासाठी बंद
ठेवावा लागला.
शिवथर परिसरात वादळी वार्यामुळे विजेचा खांब कोसळून संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. दरम्यान, शेती पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून, शेतकर्यांना मदत देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. नाशिक – मनमाड भागात अवकाळी पावसामुळे शेकडो क्विंटल कांदा भिजल्याने प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांचे तत्काळ पंचनामे करून शेतकर्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांचे आता शासनाच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मोसमीच्या प्रगतीचा वेग मंदावल्याने 15 जूनपूर्वी राज्यात सर्वत्र पेरणीयोग्य पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई न करता हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे करावी, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालय आणि कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडू शकतात. मात्र हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा ठरणार नाही. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. 12 जूनपर्यंत राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.










