Rajya Sabha Election 2026 : सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांची अनपेक्षितपणे वर्णी लागली आहे. वास्तविक पाहता, शेवटच्या क्षणापर्यंत या जागेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव निश्चित मानले जात होते. मात्र, रविवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. या बैठकीत अचानक राजेंद्र जैन यांचे नाव समोर आले आणि त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच संपूर्ण राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. छगन भुजबळ यांनी दिल्लीत राज्यसभेवर जाण्यापूर्वी, आपले पुतणे समीर भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा, अशी अट पक्षासमोर ठेवली होती. हीच अट छगन भुजबळ यांच्या राज्यसभेच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरल्याचे बोलले जात आहे. परिणामी, ऐनवेळी प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे राजेंद्र जैन यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.
राजेंद्र जैन यांच्या या निवडीमुळे राजकीय वर्तुळात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या जोडगोळीच्या पक्षांतर्गत असलेल्या अभेद्य वर्चस्वाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत रायगड मतदारसंघावरून भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तीव्र चुरस निर्माण झाली होती. अशा कठीण परिस्थितीतही सुनील तटकरे यांनी आपल्या सर्वपक्षीय संबंधांचा आणि प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा कौशल्याने वापर केला. त्यांनी आपले पुत्र अनिकेत तटकरे यांना पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. एवढेच नव्हे तर, इतर पक्षांशी यशस्वी वाटाघाटी करून अनिकेत तटकरे यांची रायगड विधानपरिषदेतून बिनविरोध निवडही घडवून आणली. हे सुनील तटकरे यांचे मोठे राजकीय यश मानले जात असतानाच, आता छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला मागे सारत प्रफुल पटेल यांनी आपल्या समर्थकाला राज्यसभेची उमेदवारी मिळवून दिली आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत मोठी धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या कार्यकारिणीची जी यादी पाठवली होती, त्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावांसमोर त्यांच्या पदांचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. तटकरे आणि पटेल यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याच्या आणि सुनेत्रा पवार या दोघांवर प्रचंड नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच पक्षाचे तरुण नेते पार्थ पवार आणि या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचेही बोलले जात होते. या घडामोडींमुळे पक्षातील तटकरे-पटेल यांचे स्थान डळमळीत झाल्याचा आणि त्यांना साईडलाईन केले गेल्याचा कयास अनेकांनी लावला होता.
अशा प्रकारे राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी अवघ्या महिनाभरात परिस्थिती पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवली आहे. प्रथम अनिकेत तटकरे आणि आता राजेंद्र जैन यांना पक्षाची महत्त्वाची उमेदवारी मिळवून देत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपले सर्वोच्च स्थान आणि दबदबा आजही कायम असल्याचे सिद्ध केले आहे.










