Chhagan Bhujbal : सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागेल अशी प्रबळ आशा बाळगून असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ऐनवेळी पक्षाकडून डावलण्यात आले. पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते अत्यंत नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी रात्री नाट्यमय घडामोडींनंतर प्रफुल पटेल यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. या निर्णयापुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण करत सोमवारी राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विधिमंडळात जाऊन राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, या प्रसंगी छगन भुजबळ स्वतः तेथे उपस्थित होते. मात्र, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखद आणि नाराजी सूचक शब्दांत व्यक्त केली.
प्रसारमाध्यमांनी जेव्हा भुजबळ यांना ‘तुमच्यावर पक्षात अन्याय झाला आहे का?’ असा थेट प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, “अन्याय कसला? हे तर राजकारणात चालायचेच. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, असे आमचे धोरण आहे. मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा (शतरंज) नाही.” त्यांच्या या विधानातून त्यांनी पक्षांतर्गत चाललेल्या राजकीय खेळींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे स्पष्ट दिसते. स्वतःला उमेदवारी न मिळणे आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळणे, या दोन्ही गोष्टींबद्दल त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त न करताही आपल्या वक्तव्यातून बरेच काही संकेत दिले.
पक्षाने राज्यसभेची उमेदवारी न देण्यामागचे कारण स्पष्ट करताना भुजबळ यांनी पडद्यामागील घडामोडींचा खुलासा केला. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडे माझा प्रस्ताव (पुतणे समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद आणि स्वतःला राज्यसभेची उमेदवारी) पाठवल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यासाठी केवळ एकच दिवस उरला होता. त्यावर भाजपकडून सकारात्मक पण प्रलंबित उत्तर आले की, आगामी काळात ज्यावेळी राज्यात मंत्रिमंडळाचा अधिकृत विस्तार होईल, तेव्हा समीर भुजबळ यांच्या नावाचा निश्चितपणे विचार केला जाईल. त्यामुळे भाजपने माझा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला या चर्चेंमध्ये तथ्य नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच, “मी अजिबात नाराज नाही, काय नाराज होणार? पक्षातील इतर नेत्यांना जो न्याय मिळाला आहे, ज्यांचे कुटुंबीय राज्यसभा किंवा लोकसभेत आहेत आणि त्यांची मुले इथे राज्यात मंत्री आहेत, तोच न्याय मलाही मिळावा ही माझी अपेक्षा होती. मी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पुढाकार घेतला आहे, त्यामुळे माझी ही मागणी रास्त होती,” अशा शब्दांत त्यांनी पक्ष नेतृत्वाला घरचा आहेर दिला.
या संपूर्ण राजकीय नाट्याची पार्श्वभूमी अशी होती की, छगन भुजबळ यांनी पक्षासमोर एक अट ठेवली होती. त्यानुसार, त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याचे अधिकृत पत्र मिळाल्यानंतरच ते राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार होते. भुजबळांच्या या अटीवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे सर्व अंतिम निर्णय भाजपचे दिल्लीतील हायकमांड घेते, त्यामुळे त्यांना विचारणा केल्याशिवाय तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही..










