Sanjay Raut : यवतमाळ-वाशिमचे उबाठाचे खासदार संजय देशमुख हे मुलीच्या लग्नाच्या तयारीचे कारण सांगत काल मातोश्रीवरील महत्त्वाच्या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. मात्र आज दुसर्याच दिवशी ते दिल्लीला गेले. तिथे त्यांनी शिंदे गटाचे खासदार तथा केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे उबाठाचे खासदार फुटणार, या चर्चेला जोर आला. खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यानंतर आणखी घडामोडी घडल्या. उबाठाचे संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना झाले.
उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीवर पक्षाच्या 10 खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला संजय देशमुख यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. त्यानंतर आज त्यांनी दिल्लीत शिंदे गटाचे मंत्री प्रताप जाधव यांची निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे ‘ऑपरेशन टायगर’ घडणार, असा संशय वाढला आहे. दरम्यान, वाढत्या चर्चांनंतर देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत स्पष्टीकरण दिले असे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या शैक्षणिक संस्थेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी ही भेट घेतल्याचा दावा त्यांनी केला.
संजय देशमुख यांच्या भेटीबाबत प्रताप जाधव म्हणाले की, संजय देशमुख आणि आम्ही संघटनेपासूनच मित्र आहोत. ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख होते त्या काळात मी बुलडाणा जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख होतो. आम्ही दोघेही एकाच विभागातील असल्याने आमची मैत्री आणि संबंध चांगले आहेत. राजकारणात आम्ही विरोधक असलो तरी वैयक्तिक संबंध जपले आहेत. उद्धव साहेब सुद्धा फडणवीस साहेबांना अनेकदा भेटायला गेले आहेत, संजय देशमुख आयुर्वेद कॉलेजच्या संदर्भात काही माहिती घेण्यासाठी आले होते. मी दिल्लीत असल्यामुळे आणि योगायोगाने तेही आज सकाळी येथे आल्याने भेट झाली. तरीही संशय कायम आहे. भाजपाला काही महत्त्वाची विधेयके मंजूर करून घ्यायची असल्याने त्यांना लोकसभा व राज्यसभेत निर्णायक बहुमत हवे आहे. त्यासाठी पक्ष फोडण्याची मोहीम सुरू झाली आहे.









