Pakistan Police Firing : पाकिस्तानमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे, जिथे पोलिसांच्या एका अविचाराने केलेल्या गोळीबारात ९ वर्षांच्या निष्पाप ऑस्ट्रेलियन बालिकेचा मृत्यू झाला आहे. हानिया अहमद असे या चिमुरडीचे नाव असून, ती आपल्या कुटुंबासह पाकिस्तानमध्ये पर्यटनासाठी आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती. पोलिसांच्या या भयंकर चुकीमुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पर्थमधील कुटुंब नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते पाकिस्तानला
अधिकच्या माहितीनुसार, हे मूळचे पाकिस्तानी असलेले कुटुंब ऑस्ट्रेलियातील पर्थ (Perth) शहरात असलेल्या केवडेल (Kewdale) भागात वास्तव्यास आहे. पंजाब प्रांतातील चकवाल (Chakwal) शहरात राहणाऱ्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी हे कुटुंब काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानात दाखल झाले होते. बुधवारी रात्री हे कुटुंब एका भाड्याच्या गाडीने (Rent a Car) प्रवास करत असताना हा भीषण प्रसंग घडला. प्रवासादरम्यान वाटेतच काही अज्ञात सशस्त्र गुंडांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान ऐवज बळजबरीने लुटला.
लुटारू समजून पोलिसांचा गाडीवर अंदाधुंद गोळीबार
या जबरी चोमीनंतर दुचाकीवर आलेले दोन लुटारू घटनास्थळावरून वेगाने पळून जाऊ लागले. त्याच वेळी तिथून जाणाऱ्या पोलीस पथकाची नजर या पळणाऱ्या लुटारूंवर पडली. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन लुटारू दुसऱ्या दिशेला निसटले आणि त्याच वेळी लुटमार झालेले हे कुटुंबही घाबरलेल्या अवस्थेत आपली भाड्याची गाडी घेऊन पुढे निघाले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून वेगाने पुढे जाणाऱ्या या कुटुंबाच्या गाडीलाच पोलिसांनी लुटारूंची गाडी समजले. कोणताही विचार न करता पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग करत त्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या थेट गाडीच्या मागच्या बाजूला बसलेल्या हानियाला लागल्याने या ९ वर्षांच्या चिमुरडीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
पिता आणि भाऊ गंभीर जखमी; चौकशीची मागणी
या भीषण गोळीबारात केवळ हानियाचा मृत्यू झाला नाही, तर तिचे वडील अहमद आणि तिचा मोठा भाऊ हे देखील गोळ्या लागल्याने गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने, हानियाची आई या संपूर्ण हल्ल्यात सुरक्षित बचावली आहे, मात्र डोळ्यांदेखत पोटच्या लेकीचा झालेला अंत आणि पती-मुलाची गंभीर अवस्था पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
चकमकीचा पोलिसांचा दावा; वडिलांचा थेट नकार
या धक्कादायक घटनेनंतर पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, मोटारसायकलवरून पळणाऱ्या संशयित लुटारूंनी प्रथम एका पोलीस अधिकाऱ्याच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी प्रत्युत्तराखल गोळीबार केला आणि या दोन्ही बाजूंच्या चकमकीत (Encounter) कुटुंबाची गाडी मधे आल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. मात्र, हानियाचे वडील अहमद यांनी एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत पोलिसांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. “तिथे कोणतीही चकमक झाली नाही. लुटारू पळून गेल्यानंतर पोलिसांनीच सर्वात आधी आणि थेट आमच्या गाडीला लक्ष्य करून अंधाधुंद गोळीबार केला,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची कठोर भूमिका आणि पारदर्शक चौकशीची मागणी
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका ९ वर्षांच्या ऑस्ट्रेलियन मुलीचा अशा प्रकारे मृत्यू होणे अत्यंत वेदनादायक असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तान सरकारकडे या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
पंतप्रधान अल्बानीज म्हणाले की, ही चौकशी केवळ नावापुरती नसावी, तर ती पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष असायला हवी. सर्वप्रथम या दुःखात बुडालेल्या कुटुंबाला आणि त्यानंतर जगाला या घटनेमागील नेमके सत्य काय आहे, हे समजलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
ऑस्ट्रेलिया परराष्ट्र मंत्रालयाकडून दूतावास मदत
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Department of Foreign Affairs and Trade) अधिकृतपणे या घटनेची पुष्टी केली आहे. मृत हानियाच्या कुटुंबाला आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी ऑस्ट्रेलियन नागरिकांना सर्व प्रकारची राजनैतिक आणि दूतावास मदत (Consular Assistance) पुरवली जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच, या कठीण प्रसंगात ऑस्ट्रेलिया सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांनी आपल्या नागरिकाच्या मृत्यूवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पाकिस्तानात पोलिसांच्या गोळीबारात ९ वर्षांच्या ऑस्ट्रेलियन चिमुरडीचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत संवेदनशील प्रकरणात अखेर प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंजाब प्रांताच्या पोलीस प्रशासनाने या प्रकरणी थेट कारवाई करत गोळीबार करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केले असून, त्याला अटक देखील करण्यात आली आहे. या बेजबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध थेट हत्येचा (कलम ३०२ अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष तपासासाठी शासनाने एक संयुक्त तपास पथक (Joint Investigation Team – JIT) गठीत केले आहे. दरम्यान, मूळ घटनेतील दरोड्यात सामील असलेल्या दोन संशयित गुन्हेगारांचा शोध घेत असताना, नंतर झालेल्या एका वेगळ्या पोलीस चकमकीत ते दोन्ही दरोडेखोर ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोन्ही देशांमध्ये तीव्र संताप; ‘चुकीच्या ओळखीचा’ (Wrong Identity) दावा
या हृदयद्रावक घटनेमुळे केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर पीडित कुटुंब वास्तव्यास असलेल्या ऑस्ट्रेलिया देशातही नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेवर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी याला ‘चुकीच्या ओळखीमुळे’ (Wrong Identity) घडलेली एक अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटना म्हटले आहे. तसेच, नवनिर्मित संयुक्त तपास पथकाद्वारे या प्रकरणाची पूर्णपणे पारदर्शक चौकशी केली जाईल आणि पीडित ऑस्ट्रेलियन कुटुंबाला हरतऱ्हेने न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
पोलीस कार्यपद्धती आणि कथित बनावट चकमकींवर प्रश्नचिन्ह
या अघोरी घटनेमुळे पाकिस्तानमधील पोलीस प्रशासनाच्या एकूणच कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या हिंसक मानसिकतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः, गुन्हेगारांचा पाठलाग करताना किंवा त्यांच्याविरुद्ध कारवाई करताना पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या अमर्याद बळाच्या वापराबाबत (Use of Force) आणि त्यात निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यास निश्चित केल्या जाणाऱ्या उत्तरदायित्वाच्या (Accountability) पद्धतींवर संपूर्ण देशात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी (Human Rights Organizations) या संदर्भात तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानात पोलिसांकडून होणारा अंदाधुंद गोळीबार, पोलीस कोठडीतील अमानुष छळ आणि ‘बनावट चकमकी’ (Fake Encounters) यांबद्दल या संघटनांनी दीर्घकाळापासून आवाज उठवला आहे. स्वतः शासकीय वरिष्ठ अधिकारी देखील ही बाब मान्य करत आले आहेत की, कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांच्या वर्तनात बदल घडवण्यासाठी त्यांच्या आधुनिक प्रशिक्षणाची आणि सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठी तातडीने सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारकडून कौन्सुलर मदत सुरू
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले आहे की, ते या भीषण संकटात सापडलेल्या आपल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करत आहेत. अधिकच्या माहितीनुसार, मृत पावलेल्या निष्पाप ऑस्ट्रेलियन मुलीच्या कुटुंबाला आणि या दुर्दैवी गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या इतर दोन ऑस्ट्रेलियन नागरिकांना (तिचे वडील आणि भाऊ) आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आवश्यक ती सर्व कौन्सुलर (दूतावास) मदत तातडीने पुरवली जात आहे.









