Nasrapur Case : पुणे जिल्ह्यातील भोर जवळील नसरापूर गावामध्ये एका चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली होती. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सध्या विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुरू आहे. अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदवून न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटला ठरलेल्या या प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद आज, शनिवारी (दि. २० जून २०२६) होणार आहे. त्यामुळे या खटल्याच्या अंतिम निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आरोपीचा न्यायालयात खोटा बनाव आणि कबुली-
शुक्रवारी (दि. १९ जून) न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मुख्य आरोपीला हजर करण्यात आले होते. ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३’ च्या कलम ३५१ अन्वये आरोपीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाली. यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपीने न्यायालयात एक खोटा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी तो राम मंदिरातून घायवळ्यांच्या शेडमध्ये गेला असता तिथे ती मुलगी आली. तिला गाठी शेव देऊन गोठ्यात नेत असताना त्याचा पाय घसरला, ज्यामुळे मुलीच्या डोक्याला दुखापत झाली आणि ती रडू लागली. लोक आपल्यावर संशय घेतील या भीतीने आपण तिला तिथेच खाटेवर सोडून काळूबाई मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन बसलो, असा धक्कादायक व असत्य दावा त्याने केला. एवढेच नव्हे, तर स्वतःच्या बचावासाठी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार तपासण्यास त्याने साफ नकार दिला.
सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि डीएनए (DNA) पुराव्यांमुळे गुन्हेगार उघडा:
न्यायालयात सुनावणीदरम्यान चिमुरडीला सोबत घेऊन जातानाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ आरोपीला दाखवण्यात आला. सुरुवातीला त्याने नकार दिला, परंतु न्यायालयाने ६ ते ७ वेळा ते फुटेज झूम करून दाखवल्यानंतर नराधमाला खोटे बोलता आले नाही. “यात दिसणारा पुरुष मीच आहे,” अशी कबुली त्याला द्यावी लागली; मात्र सोबतची मुलगी कोण आहे, हे माहित नसल्याचे सांगत त्याने पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सादर केलेल्या वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांनी आरोपीचा हा खोटा दावा पूर्णपणे खोडून काढला. डीएनए अहवालानुसार, पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगावर आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या कपड्यात (स्लॅक) आरोपीचे अंश आढळून आले आहेत. या भक्कम वैज्ञानिक पुराव्यामुळे न्यायालयात आरोपी पूर्णपणे कोंडीत सापडला असून त्यानेच हा क्रूर गुन्हा केल्याचे सिद्ध झाले आहे.
काय घडले होते नसरापूरमध्ये?
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी आपल्या आजीकडे आलेल्या या निष्पाप चिमुरडीवर १ मे रोजी ६५ वर्षीय नराधम आरोपीने वासरे दाखवण्याचे आमिष दाखवून तिला गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केल्यानंतर, तिने आरडाओरडा करू नये म्हणून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. दुपारी मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, साडेतीन वाजताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी तिचा हात धरून गोठ्याकडे नेताना दिसला. यानंतर गोठ्यात तिचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. संतापलेल्या ग्रामस्थांनी नराधमाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
नराधमाची उद्दाम वृत्ती आणि पार्श्वभूमी:
इतके अमानुष कृत्य करूनही या आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नाही. कोर्टात जेव्हा न्यायाधीशांनी त्याला विचारले की, “तुला तुझी केस काय आहे हे माहिती आहे का?” त्यावर अत्यंत उद्दामपणे, “ही मारामारीची किरकोळ केस आहे,” असे संतापजनक उत्तर त्याने दिले. विशेष म्हणजे, या नराधमाने असे कृत्य करण्याची ही पहिली वेळ नसून, यापूर्वीही त्याने दोनदा अशाच घटना केल्या होत्या; मात्र पुराव्याभावी तो कायद्याच्या कचाट्यातून सुटला होता.









