Home / देश-विदेश / Cockroach Janata Party : जंतर-मंतरवर ‘कॉकरोच पार्टी’चा जोरदार थाळीनाद; मागण्या मान्य न झाल्यास २७ जूनपासून सोनम वांगचुक आक्रमक पवित्र्यात, उपोषणाचा दिला इशारा..

Cockroach Janata Party : जंतर-मंतरवर ‘कॉकरोच पार्टी’चा जोरदार थाळीनाद; मागण्या मान्य न झाल्यास २७ जूनपासून सोनम वांगचुक आक्रमक पवित्र्यात, उपोषणाचा दिला इशारा..

Cockroach Janata Party : राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ (NEET-UG) परीक्षेतील कथित पेपरफुटीचे प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनियमितता आणि यामुळे त्रस्त होऊन...

By: Team Navakal
Cockroach Janata Party
Social + WhatsApp CTA

Cockroach Janata Party : राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ (NEET-UG) परीक्षेतील कथित पेपरफुटीचे प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनियमितता आणि यामुळे त्रस्त होऊन विद्यार्थ्यांमध्ये वाढणारे आत्महत्येचे भीषण सत्र यांविरोधात देशाची राजधानी दिल्लीत मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. या गंभीर प्रश्नांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने आजपासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्या तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी हातात थाळ्या घेऊन त्या वाजवत केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. “शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” अशी आग्रही मागणी करत आंदोलकांनी संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हेदेखील उपस्थित होते. त्यांनी सरकारला या शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहारांबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी २७ जूनपर्यंतची अंतिम मुदत दिली असून, सकारात्मक पावले न उचलल्यास स्वतः बेमुदत उपोषणाला बसण्याचा आक्रमक इशारा दिला आहे.

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थ्यांचा एल्गार-
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या मुख्य नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात देशभरातून आलेले शेकडो विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जंतर-मंतरवरील मुख्य व्यासपीठावर ‘नीट’ परीक्षेतील गोंधळामुळे आणि मानसिक तणावामुळे आत्महत्या केलेल्या देशभरातील दुर्दैवी विद्यार्थ्यांचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले होते. आंदोलनाच्या सुरुवातीला या मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपस्थित तरुणांना संबोधित करताना अभिजीत दीपके यांनी सरकारच्या भूमिकेवर अत्यंत शेलक्या आणि उपरोधिक शब्दांत प्रहार केला.

“हा देश कोणाच्या बापाचा नाही, थाळी नादाने सरकारला जागे करू”-
आपल्या भाषणात केंद्र सरकारवर कडाडून टीका करताना अभिजीत दीपके म्हणाले की, “२०१९ आणि २०२० च्या दरम्यान या देशात एक खूप मोठा वैज्ञानिक शोध लागला होता, तो म्हणजे थाळ्या वाजवल्याने विशिष्ट कंपने (वायब्रेशन्स) निर्माण होतात आणि त्यांमुळे ‘कोरोना’ नावाचा महाभयंकर विषाणू नष्ट होतो. आता आमच्या काही तरुण मित्रांनी शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करून आणखी एक नवीन शोध लावला आहे की, सध्या आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर ‘धर्मेंद्र प्रधान’ नावाचा एक घातक व्हायरस येऊन बसला आहे. जोपर्यंत हा व्हायरस हटत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होणार नाही.” आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांना आणि तरुणांना जे लोक सरळ ‘पाकिस्तानी’ किंवा ‘देशद्रोही’ (अँटी-नॅशनल) म्हणून हिणवतात, त्यांना खडे बोल सुनावताना ते म्हणाले की, “हा देश तुमच्या कोणाच्या बापाची जहागीर नाही, हा आमचा देश आहे आणि आपल्या हक्कासाठी आम्ही हे शांततापूर्ण आंदोलन सुरू करत आहोत.”

शांतता आणि सुसंस्कृतपणा राखण्याचे आंदोलकांना आवाहन-
आंदोलन दिशाहीन होऊ नये यासाठी दीपके यांनी उपस्थित सर्व आंदोलकांना शांततेचे आणि शिस्तीचे कडक पालन करण्याचे सामूहिक वचन दिले. ते म्हणाले, “आपण सर्वजण सुशिक्षित, सुसंस्कृत आणि खरे देशभक्त नागरिक आहोत. त्यामुळे आंदोलनादरम्यान कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड होणार नाही किंवा कोणाशीही उद्धट वर्तन केले जाणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तिथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी, आंदोलनातील महिला, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी किंवा इतर सामान्य नागरिक असोत; आपल्या कृत्यामुळे कोणालाही यत्किंचितही त्रास होता कामा नये. कायदा हातात न घेता हिंसेचा पूर्ण त्याग करून आपल्याला हा लढा जिंकायचा आहे.”

गेल्या दहा दिवसांत आपण पुणे, लखनौ, अमृतसर, बेंगळुरू, जयपूर आणि नागपूर अशा अनेक प्रमुख शहरांचा दौरा केल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी स्वतः भेटले आणि त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ करत असलेल्या या आंदोलनाचे मनापासून कौतुक केले; कारण शासकीय सेवेत असलेल्या या पोलिसांची स्वतःची मुलेदेखील आज याच सडलेल्या आणि भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेचे बळी ठरत असून मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत, अशी सद्यस्थिती त्यांनी मांडली.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या