FIFA World Cup 2026 : सध्या सुरू असलेला फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) केवळ मैनावरील थरारक सामन्यांमुळेच नव्हे, तर खेळाडूंचे नागरिकत्व, जागतिक स्थलांतर (मायग्रेशन) आणि वंशावळीच्या अत्यंत रंजक आकडेवारीमुळे क्रीडा जगतात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. या महाकुंभातील सर्व ४८ संघांच्या एकूण १,२४८ खेळाडूंचा अभ्यास केला असता, एक थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, तब्बल २९२ खेळाडू अशा देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत, ज्या देशात त्यांचा जन्मच झालेला नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आता केवळ ८ संघ असे उरले आहेत, ज्यांच्या ताफ्यात परदेशी वंशाचा किंवा दुसऱ्या देशात जन्मलेला एकही खेळाडू नाही. वाढते जागतिक स्थलांतर, जुने वसाहती संबंध आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (FIFA) नियमांमधील लवचिकता यांमुळे आधुनिक फुटबॉलचे संपूर्ण रूप पालटून गेले आहे.
फ्रान्स ठरले खेळाडूंची सर्वात मोठी ‘नर्सरी’:
स्थलांतराच्या या आकडेवारीमध्ये युरोपियन बलाढ्य फ्रान्स देश सर्वात आघाडीवर आहे. या विश्वचषकात फ्रान्समध्ये जन्मलेले तब्बल ९८ खेळाडू विविध देशांच्या जर्सीमध्ये खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या ९८ खेळाडूंपैकी केवळ २२ खेळाडू स्वतः फ्रान्सच्या राष्ट्रीय संघाकडून खेळत असून, उर्वरित ७६ खेळाडू फ्रान्सऐवी इतर देशांचे प्रतिनिधित्व करत मैदानात उतरले आहेत. फुटबॉलच्या जागतिक इतिहासात ही परिस्थिती तशी नवीन नाही; १९३० मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या विश्वचषक स्पर्धेतही अमेरिकेच्या संघात इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या खेळाडूंचा समावेश होता.
फिफाचे बदललेले नियम आणि संघांची निवड:
काळाची पावले ओळखून फिफाने दुहेरी नागरिकत्वाच्या नियमांमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. पूर्वीच्या नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने युवा स्तरावर (अंडर-१९ किंवा अंडर-२१) एखाद्या देशाचे प्रतिनिधित्व केले, तर त्याला नंतर आपला वरिष्ठ राष्ट्रीय संघ बदलण्याची परवानगी नव्हती. परंतु, २००४ आणि २००९ मध्ये अल्जेरिया फुटबॉल फेडरेशनने केलेल्या विशेष मागणीनंतर फिफाने या नियमांमध्ये शिथिलता आणली. सध्याच्या नवीन नियमांनुसार, जर एखादा खेळाडू २१ वर्षांचा होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्तीत जास्त ३ स्पर्धात्मक सामने खेळला असेल, तर शेवटच्या सामन्यानंतर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करून तो आपला राष्ट्रीय संघ बदलू शकतो. याशिवाय, खेळाडूचा स्वतःचा जन्म, त्याचे आई-वडील किंवा आजी-आजोबांचे जन्मस्थान अथवा संबंधित देशात सलग ५ वर्षे राहण्याचा कालावधी या घटकांच्या आधारावरही खेळाडूला त्या देशाचे नागरिकत्व व संघ निवडण्याचा अधिकार मिळतो.
जमाल मुसियाला, फोलारिन बालोगन आणि डेक्लान राइस यांसारखे जागतिक कीर्तीचे खेळाडू ही या नियमाची उत्तम उदाहरणे आहेत. स्टार स्ट्रायकर डिएगो कोस्टानेही ब्राझीलसाठी मैत्रीपूर्ण सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पेन देशाची निवड केली होती. अर्थात, या नियमांचा गैरवापर झाल्याची उदाहरणेही आहेत; २००४ मध्ये कतारने ब्राझीलच्या एल्टन नावाच्या स्ट्रायकरला कोणताही कौटुंबिक संबंध नसताना केवळ पैशांच्या जोरावर नागरिकत्व देण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला फिफाने नंतर चाप लावला.
खेळाडू शोधण्यासाठी लिंक्डइन, व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ गेमचा वापर:
फिफाच्या या शिथिल नियमांमुळे आता विविध देशांचे फुटबॉल फेडरेशन प्रतिभावान खेळाडू शोधण्यासाठी अत्यंत आधुनिक, डिजिटल आणि अनपेक्षित मार्ग अवलंबत आहेत. खेळाडूंचे एजंट्स तर कार्यरत असतातच, परंतु आता फेडरेशनचे अधिकारी थेट ‘लिंक्डइन’ (LinkedIn), ‘व्हॉट्सॲप’ (WhatsApp) आणि थेट ‘फुटबॉल मॅनेजर’ (Football Manager) सारख्या लोकप्रिय व्हिडिओ गेम्सच्या डेटाबेसचा आधार घेत आहेत. कॅनडाच्या ल्यूक डी फौगरोल्स या खेळाडूची राष्ट्रीय संघात झालेली निवड ही त्याच्या वडिलांनी मुख्य प्रशिक्षकाला लिंक्डइनवर पाठवलेल्या एका संदेशामुळे (मेसेज) शक्य झाली. अल्फी जोन्स नावाच्या खेळाडूची निवड तर सौना बाथमध्ये झालेल्या अनौपचारिक संवादातून झाली. तसेच, ‘फुटबॉल मॅनेजर’ या व्हिडिओ गेमच्या अचूक डेटाबेसमुळे चिली देशाला बेन ब्रेरेटन डियाजसारखा उत्कृष्ट खेळाडू मिळाला. प्रतिभावान खेळाडूंना आपल्या देशात खेचण्यासाठी फेडरेशन थेट खेळाडूंच्या कुटुंबांशी संपर्क साधत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, पोलंड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षांनी स्वतः न्यूयॉर्क गाठून युवा खेळाडू ज्युलियन हॉलच्या आईची भेट घेतली आणि त्यांना पोलंडच्या राष्ट्रीय संघाची जर्सी भेट देऊन आपल्या देशाकडून खेळण्याची गळ घातली.
परदेशी वंशाच्या खेळाडूंचा कोणत्या संघात किती भरणा?
आपल्या राष्ट्रीय संघात सर्वाधिक परदेशी वंशाचे खेळाडू समाविष्ट करण्यात आफ्रिकन देश अल्जेरिया सर्वात आघाडीवर आहे; त्यांच्या संघात तब्बल १३ परदेशी वंशाचे खेळाडू आहेत, तर हैती देश १२ खेळाडूंसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विश्वचषकात पहिल्यांदाच पदार्पण करणाऱ्या कुराकाओच्या संघात तर एका खेळाडूला वगळता संपूर्ण संघ डच (नेदरलँड्स) वंशाच्या खेळाडूंनी भरलेला आहे. यजमान कतारच्या संघात तब्बल ११ वेगवेगळ्या देशांमध्ये जन्मलेल्या खेळाडूंचा भरणा आहे.










