Income Tax Notice: सध्या सर्वसामान्य करदात्यांचे लक्ष इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेकडे लागलेले असतानाच, दुसरीकडे ३0 जून ही तारीख करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भरलेल्या आयटीआरच्या तपासणीसाठी प्राप्तिकर विभागाकडे कलम 143(2) अंतर्गत स्क्रुटिनी नोटीस म्हणजेच चौकशीची नोटीस पाठवण्यासाठी ३0 जून हा शेवटचा दिवस आहे.
इन्कम टॅक्स विभागाला जर एखाद्या करदात्याच्या रिटर्नमध्ये काही संशयास्पद वाटले, तर ते अधिक माहितीसाठी ही नोटीस बजावतात. नोटीस मिळणे म्हणजे तुम्ही काहीतरी गुन्हा केला आहे असा होत नाही, तर त्याचा अर्थ केवळ एवढाच असतो की कर अधिकाऱ्यांना तुमच्या कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी काही अतिरिक्त कागदपत्रांची आणि पुराव्यांची पडताळणी करायची असते.
‘या’ ५ कारणांमुळे येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस; AI कडून ठेवली जातेय नजर
आजकाल प्राप्तिकर विभाग प्रगत डेटा अॅनालिटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून संशयास्पद कर परताव्यांवर बारीक लक्ष ठेवून आहे. प्रामुख्याने खालील कारणांमुळे करदात्यांना नोटीस पाठवली जाऊ शकते:
- माहितीतील तफावत: तुमच्या आयटीआरमधील माहिती आणि फॉर्म 26AS किंवा एआयएस (AIS) मधील तपशील मॅच न होणे.
- जीएसटी आणि ऑडिट तफावत: जीएसटी रेकॉर्डमधील उलाढाल आणि टॅक्स ऑडिट रिपोर्टमधील आकड्यांमध्ये फरक असणे.
- मोठे आर्थिक व्यवहार: फॉर्म 26AS मध्ये नोंदवलेले मोठे आर्थिक व्यवहार किंवा बँक खात्यातील मोठे व्यवहार आयटीआरमध्ये न दाखवणे.
- अवाजवी वजावट: तुमच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत कमालीची मोठी टॅक्स वजावट (डिडक्शन) क्लेम करणे.
- मालमत्ता विक्री: निबंधक (रजिस्ट्रार) कार्यालयातील रेकॉर्डनुसार झालेली मालमत्ता किंवा जमिनीची खरेदी-विक्री आयटीआरमध्ये लपवणे.
जर तुम्हाला तुमच्या आधीच्या रिटर्नमध्ये काही चूक आढळली, तर नोटीसची वाट न पाहता तुम्ही स्वतःहून अपडेटेड रिटर्न (ITR-U) भरून ती चूक सुधारू शकता, जेणेकरून पुढील कायदेशीर गुंतागुंत टाळता येईल.
नोटीस आल्यास काय करावे? ऑनलाईन उत्तर देण्याची सोपी प्रोसेस
प्राप्तिकर विभागाची स्क्रुटिनी नोटीस करदात्याच्या नोंदणीकृत ईमेलवर पीडीएफ स्वरूपात किंवा टपाल पत्त्यावर पाठवली जाते. तसेच तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करूनही ती तपासू शकता. नोटीस आल्यास खालील पायऱ्या फॉलो कराव्या:
१. इन्कम टॅक्सच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा.
२. मेन्यूमधील ‘वर्कलिस्ट’ (Worklist) या पर्यायावर जाऊन ‘ई-प्रोसीडिंग्ज’ (E-proceedings) वर क्लिक करा.
३. तिथे आलेल्या नोटीसवर क्लिक करून ‘व्ह्यू नोटीस’ (View Notice) निवडा आणि ‘सबमिट रिस्पॉन्स’वर क्लिक करा.
४. जर तुम्ही नोटीस मधील मुद्द्यांशी सहमत असाल, तर ऑफलाइन युटिलिटीद्वारे तयार केलेली आयटीआरची जेएसओएन (JSON) फाईल अपलोड करून ती सबमिट करा.
५. जर तुम्ही असहमत असाल, तर असहमतीचे योग्य कारण निवडून आवश्यक पुरावे आणि कागदपत्रे ऑनलाईन सबमिट करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला ट्रान्झॅक्शन नंबर मिळेल.
नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास बसेल १०,००० रुपयांचा फटका; होऊ शकते जेल
अनेक करदाते इन्कम टॅक्सच्या नोटीसकडे गांभीर्याने पाहत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु असे करणे महागात पडू शकते. जर तुम्ही दिलेल्या मुदतीत उत्तर दिले नाही, तर कलम 272A अंतर्गत प्रत्येक वेळच्या चुकीसाठी 10,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
याशिवाय, कर अधिकारी उपलब्ध माहितीच्या आधारे स्वतःच्या अधिकारात अंतिम कर आकारणी करू शकतात, ज्यामुळे तुमच्यावर मोठा कर आणि अतिरिक्त दंड लादला जाऊ शकतो. या निर्णयाविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करायचे असल्यास, आधी थकीत कराची किमान 20% रक्कम भरणे बंधनकारक असते. मुद्दाम चुकीची माहिती दिल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास करदात्याला थेट तुरुंगवासाची कारवाई देखील सहन करावी लागू शकते.










