Home / देश-विदेश / Ayodhya Ram Mandir Donation Case : उद्धव ठाकरेंनी दिलेली ४ किलो चांदीची वीट अन् कोटींचं दान गेलं कुठे? अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी मुख्य ट्रस्टींचा राजीनामा…

Ayodhya Ram Mandir Donation Case : उद्धव ठाकरेंनी दिलेली ४ किलो चांदीची वीट अन् कोटींचं दान गेलं कुठे? अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी मुख्य ट्रस्टींचा राजीनामा…

Ayodhya Ram Mandir Donation Case : अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरामध्ये भाविकांनी अर्पण केलेले दान चोरीला गेल्याचे अत्यंत धक्कादायक आणि...

By: Team Navakal
Ayodhya Ram Mandir Donation Case:
Social + WhatsApp CTA

Ayodhya Ram Mandir Donation Case : अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरामध्ये भाविकांनी अर्पण केलेले दान चोरीला गेल्याचे अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या महाघोटाळ्याप्रकरणी ‘विशेष तपास पथका’च्या (SIT) अंतरिम चौकशीनंतर आठ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यानंतर ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे महासचिव चंपत राय आणि आणखी एक प्रमुख विश्वस्त (ट्रस्टी) डॉ. अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. अटक करण्यात आलेले सर्व कर्मचारी या दोन्ही बड्या पदाधिकाऱ्यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि नातेवाईक असल्यामुळे हे दोन्ही मुख्य विश्वस्त संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. “संबंधित मुख्य पदाधिकाऱ्यांवर अद्याप फौजदारी गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत?” असा तीव्र प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात असतानाच त्यांनी दिलेले राजीनामे म्हणजे संभाव्य कायदेशीर अटकेपासून वाचण्यासाठी केलेली पळवाट आहे, अशी चर्चा आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगू लागली आहे.

“उद्धव ठाकरेंच्या चांदीच्या विटेची पावतीच दिली नाही” – खासदार संजय राऊत
या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही कमालीचे तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्यावर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांचे गुप्त दान धनादेशाद्वारे (चेक) दिले होते. त्यासोबतच, ४ किलो वजनाची एक शुद्ध चांदीची वीटही मंदिराला अर्पण करण्यात आली होती. परंतु, आश्चर्यकारक बाब म्हणजे या चांदीच्या विटेची कोणतीही अधिकृत पावती ट्रस्टकडून देण्यात आली नाही.”

राऊत यांनी पुढे सवाल केला की, ती चांदीची वीट आणि कोट्यवधी रुपयांचे दान नेमके कुठे गेले? मंदिराला मिळालेल्या एकूण सोन्या-चांदीच्या विटेसह, मूर्ती आणि रोख रकमेसह तब्बल २ हजार कोटी रुपयांचे दान चोरल्याचा प्राथमिक आरोप असून हा आकडा केवळ हिमनगाचे टोक असल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. हा निधी महाराष्ट्रातील राजकारणात आमदार-खासदारांच्या फोडाफोडीसाठी वापरला गेला का? असा संशय व्यक्त करत, दानपेटीवरील या दरोड्याला आपण ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव देऊ, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

एसआयटीचा अहवाल सादर, पण योगी सरकारकडून गोपनियता; बड्या नेत्यांना क्लीन चिट?
राम मंदिरातील हा ऐतिहासिक चोरीचा प्रकार ६ जून २०२६ रोजी उघडकीस आला होता. मात्र, सुरुवातीला चौकशीबाबत प्रशासकीय पातळीवर प्रचंड टोलवाटोलवी आणि दिरंगाई सुरू होती. अखेर एका हिंदुत्ववादी संघटनेने लेखी तक्रार दिल्यानंतर आणि जनक्षोभ वाढल्यानंतर, उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी ‘एसआयटी’ची स्थापना केली. एसआयटीने २३ जून रोजी आपला प्राथमिक अहवाल उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय प्रसाद यांना सुपूर्द केला. मात्र, या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, कारण संजय प्रसाद हे स्वतः या राम मंदिर ट्रस्टचे पदसिद्ध सदस्य आहेत आणि योगी सरकारने हा तपास अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही.

तसेच, दाखल करण्यात आलेल्या पहिल्या आरोपपत्रात आणि एफआयआरमध्ये (FIR) केवळ दानपेटी मोजण्याची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे; परंतु घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेले महासचिव चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्यासारख्या बड्या नेत्यांची नावे या एफआयआरमधून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे.

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
ट्रस्टचे विश्वस्त कृष्ण मोहन यांच्या अधिकृत तक्रारीनंतर अयोध्येतील रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालील प्रमुख आरोपींना अटक केली असून त्यांची रात्रभर कसून चौकशी करण्यात आली आहे:
रामशंकर यादव उर्फ टिन्नू (महासचिव चंपत राय यांचा खासगी गाडी चालक)
अनुकल्प मिश्रा (विश्वस्त अनिल मिश्रा यांचा जवळचा नातेवाईक)
लवकुश मिश्रा (विश्वस्त अनिल मिश्रा यांचा नातेवाईक)
सुभाष श्रीवास्तव (दान गणना प्रभारी आणि मुख्य सूत्रधार)
मनीष यादव, अविनाश शुक्ला, करुणेश पांडेय आणि रमाशंकर मिश्रा (दान मोजणारे कर्मचारी)
पोलीस तपासादरम्यान आतापर्यंत या आरोपींच्या ताब्यातून सुमारे ६० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

बाथरूममध्ये नोटांचे बंडल लपवून संघटित दरोडा; सीसीटीव्ही पुराव्यांवर तांत्रिक मर्यादा
पोलिसांच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, ही चोरी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अत्यंत संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू होती. दानपेटीतून रक्कम काढल्यानंतर अनुकल्प मिश्रा आणि त्याचे साथीदार नोटांचे बंडल गुप्तपणे मंदिराच्या बाथरूममध्ये लपवून ठेवत असत. त्यानंतर योग्य संधी साधून ते पैसे मंदिराबाहेर नेले जायचे आणि एका गुप्त ठिकाणी या चोरीच्या पैशांची आपापसात वाटणी केली जायची. संपूर्ण कटात चालक टिन्नू यादव आणि गणना प्रभारी सुभाष श्रीवास्तव यांची मुख्य भूमिका असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज हा मुख्य तांत्रिक पुरावा म्हणून जप्त केला आहे. मात्र, या तपासात एक मोठी अडचण समोर आली आहे; मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची साठवणूक क्षमता (स्टोरेज) केवळ ४५ दिवसांची असून त्यानंतर जुने फुटेज आपोआप नष्ट (ऑटो-डिलिट) होते.अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी
प्रमुख ट्रस्टींचा राजीनामा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Medha Kulkarni

Medha Kulkarni : सारथी’च्या कार्यक्रमात पहिल्या रांगेतील बैठकीवरून भाजपात अंतर्गत वाद; शासकीय राजशिष्टाचार कधीही जातीच्या आधारावर ठरत नाही – खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार आमनेसामने