Home / महाराष्ट्र / TET Paper Leack : नीट’ परीक्षेचा महा-घोटाळा ताजा असतानाच महाराष्ट्रात आणखी एका परीक्षेचा पेपर फुटला!; ठाण्यात विद्यार्थ्यांचा तीव्र संताप

TET Paper Leack : नीट’ परीक्षेचा महा-घोटाळा ताजा असतानाच महाराष्ट्रात आणखी एका परीक्षेचा पेपर फुटला!; ठाण्यात विद्यार्थ्यांचा तीव्र संताप

TET Paper Leack : ठाणे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली असून, शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) गोपनीय...

By: Team Navakal
TET Paper Leack 
Social + WhatsApp CTA

TET Paper Leack : ठाणे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली असून, शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) गोपनीय पेपर फुटल्याने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत उद्या होणारी ही परीक्षा तूर्तास रद्द करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

२ लाखांहून अधिक उमेदवारांना फटका
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या (रविवारी) या परीक्षेचे राज्यभरात आयोजन करण्यात आले होते. भावी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारे तब्बल २ लाख २६ हजार उमेदवार या परीक्षेला बसणार होते. मात्र, परीक्षेच्या अवघ्या काही तास आधीच ठाण्यातून हा पेपर फुटल्याची खात्रीलायक माहिती समोर आली. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो उमेदवारांच्या कष्टावर पाणी फेरले गेले असून, त्यांच्यामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. आता राज्य परीक्षा परिषदेकडून अधिकृत परिपत्रक जारी केले जाणार असून, त्यात परीक्षेची आगामी नवीन तारीख घोषित केली जाण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षांचा सरकारवर घणाघाती हल्ला
या संवेदनशील प्रकरणावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पेपरफुटीच्या या गंभीर प्रकारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

“या सरकारला साधी टीईटीची परीक्षा देखील सुरळीतपणे हाताळता येत नाही. ‘नीट’ (NEET) पेपरफुटीचे मुख्य केंद्र महाराष्ट्रात असल्याचे आधीच उघड झाले आहे. हे सरकार एकीकडे सुशासनाच्या (Good Governance) आणि भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या (Zero Tolerance) मोठ्या गप्पा मारते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे विपरीत आहे. नीट प्रकरणातील अनेक दोषींना तुरुंगात डांबल्यानंतरही जर टीईटीचा पेपर फुटत असेल, तर याचा स्पष्ट अर्थ असा होतो की या संपूर्ण गैरप्रकारात कुठेतरी शासकीय यंत्रणेचा किंवा सरकारचाच सहभाग आहे.”असे अंबादास दानवे म्हणाले.

“भावी पिढी घडवणाऱ्यांचाच विश्वासघात”
दानवे यांनी पुढे बोलताना सांगितले की, जे शिक्षक उद्या चालून देशाची भावी पिढी घडवणार आहेत, त्यांच्याच पात्रता परीक्षेचा पेपर अशा प्रकारे फुटणे हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. आपण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कोणत्या दिशेने चाललो आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची आता वेळ आली आहे. हे सरकार पूर्णपणे कमकुवत आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्यानेच अशा घटना वारंवार घडत आहेत. एका छोट्या परीक्षेची गोपनीयता राखणे ज्यांना जमत नाही, ते राज्य काय चालवणार? हे सरकार सध्या केवळ ‘भगवान भरोसे’ सुरू आहे, असा घणाघात त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधार आणि रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी आता विद्यार्थी आणि पालकांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे. परीक्षेच्या नवीन तारखांबाबत शासन काय निर्णय घेते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या