Raj Thackeray : देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, त्याला काही मर्यादा आहेत की नाही?” असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवर अत्यंत कडक शब्दांत प्रहार करताना त्यांनी सत्ताधारी आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. “सध्याचा मूळ प्रश्न हा लोकप्रतिनिधींना विकत घेणाऱ्यांचा नसून, स्वतःची निष्ठा विकायला काढणाऱ्यांचा आहे,” अशा मर्मभेदी शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
केवळ फोडाफोडी आणि पैशांचेच राजकारण
राज ठाकरे यांनी राज्यातील विदारक राजकीय परिस्थितीवर बोट ठेवत राजकीय मूल्यांच्या घसरणीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या देशात आणि महाराष्ट्रात केवळ आणि केवळ फोडाफोडीचेच राजकारण पाहायला मिळत आहे. राजकारणाचे उद्दिष्ट आता लोककल्याण राहिले नसून, केवळ सत्ता मिळवणे, पक्ष फोडणे आणि त्यातून अमाप पैसा कमावणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. राजकीय पक्षांचे संपूर्ण लक्ष केवळ निवडणुका आणि सत्तेच्या समीकरणांवर केंद्रित आहे. या साऱ्या चिखलफेकीत राज्यातील शहरांच्या दुरवस्थेकडे आणि त्यांच्या नियोजित उभारणीकडे कोणाचेही लक्ष उरलेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
या सर्व घडामोडींमागे अमित शाह यांचीच रणनीती-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून नुकत्याच झालेल्या खासदारांच्या बंडावर बोलताना त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले,”शिवसेनेतून जे ६ खासदार फुटले, ते भारतीय जनता पक्षात का गेले नाहीत? ते दुसऱ्या गटात का सामील झाले? यामागे एक अत्यंत दूरगामी आणि सूक्ष्म राजकीय खेळी आहे. हे संपूर्ण राजकारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीनुसार सुरू आहे.”
भविष्यातील अंतर्गत विरोधाची भीती आणि शाह यांची गणिते-
या राजकीय फोडाफोडीमागील पडद्यामागचे गणित उलगडताना राज ठाकरे यांनी एक मोठा दावा केला. त्यांच्या मते, “उद्या जर पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी स्वतःच्याच पक्षातून (भाजपमधून) अंतर्गत विरोध किंवा अडचण निर्माण झाली, तर अशा वेळी स्वतःच्या पक्षावर विसंबून न राहता, बाहेरून पाठिंबा देणारे हुकमी एक्के हाताशी असावेत, म्हणूनच अमित शाह यांनी ही तजवीज करून ठेवली आहे.” स्वतःचा पक्ष मजबूत करण्याऐवजी बाहेरील विरोधी पक्ष संपवणे आणि इतर पक्षांतील खासदारांना आपल्या इशाऱ्यावर चालणाऱ्या गटात सामील करून घेणे, हीच अमित शाह यांची रणनीती असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या या थेट आणि आक्रमक विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आता नव्या वादाला तोंड फुटले असून चर्चांना उधाण आले आहे.










