Ankur Warikoo Parenting Tips: मुलांना स्वावलंबी, जबाबदार आणि खंबीर बनवायचे असेल, तर त्याची सुरुवात घरातूनच आणि अगदी बालपणापासून व्हायला हवी, असे मत प्रसिद्ध उद्योजक आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर अंकुर वारिकू यांनी व्यक्त केले आहे. ‘वेबवेदा’चे संस्थापक असलेल्या अंकुर यांनी एका मुलाखतीत पालकांसाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
नेहा नगर यांच्याशी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी पालकांना ३ अशा गोष्टी सांगितल्या, ज्या मुलांचे चारित्र्य घडवण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील यशापयशाचा सामना करण्यासाठी तयार करण्यास मदत करतात. मुलांचे संगोपन करताना केवळ त्यांना अपयशापासून वाचवणे महत्त्वाचे नसून, त्यांना आव्हानांचा सामना करण्याची ताकद देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालकांसाठी ३ सुवर्णनियम; मुलांच्या मनात रुजवा ‘या’ गोष्टी
अंकुर वारिकू यांनी पालकांना आपल्या दैनंदिन जीवनात खालील ३ सूत्रांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे:
- १. आदर (रिस्पेक्ट): प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे मुलांनी शिकले पाहिजे. समोरच्या व्यक्तीचे रूप कसे आहे, ती काय बोलते, तिचा जन्म कुठे झाला आहे, ती किती कमावते किंवा तिचे पद काय आहे, यावरून तिचा आदर ठरता कामा नये. मुलांनी सर्वांना समान लेखले पाहिजे आणि स्वतःसाठीही तशाच आदराची अपेक्षा ठेवली पाहिजे.
- २. जबाबदारीची जाणीव (अकाउंटेबिलिटी): आयुष्यात जी काही परिस्थिती येईल, त्याला आपण आणि फक्त आपणच जबाबदार आहोत, ही भावना मुलांमध्ये असणे आवश्यक आहे.
- ३. मालकी हक्क आणि सर्वोत्तम प्रयत्न (ओनरशिप): प्रत्येक गोष्टीत नेहमी जिंकणेच महत्त्वाचे नसते. परंतु, कोणतेही काम पूर्ण केल्यानंतर ‘मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले’ असे समाधानाने स्वतःला सांगता आले पाहिजे. कष्टांमध्ये कोणतीही कसर न सोडण्याची सवय मुलांना लावा.
मुलगा चालताना पडल्यावर बहुतांश पालक करतात ‘ही’ चूक
जबाबदारीच्या नियमाचे उदाहरण देताना अंकुर वारिकू यांनी भारतीय घरांमधील एका मानसिकतेवर कडक शब्दांत बोट ठेवले आहे:
मुले जेव्हा चालायला शिकतात, तेव्हा ती अनेकदा जमिनीवर पडतात. अशा वेळी घरातील मोठे लोक किंवा पालक धावत जातात, मुलाला उचलतात आणि ‘या जमिनीने माझ्या बाळाला पाडले’ असे म्हणत जमिनीला किंवा जमिनीवरील वस्तूला मारू लागतात.
अंकुर यांच्या मते, हा मुलाला शिकवला जाणारा अत्यंत चुकीचा आणि घातक धडा आहे. यामुळे मुलाच्या मनात नकळतपणे असे विचार रुजतात की, जेव्हा आपल्याला त्रास होतो, तेव्हा स्वतः जबाबदारी घेण्याऐवजी आपण ज्याच्यावर दोष ठेवतोय, त्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर राग काढला पाहिजे. पालकांनी ही चूक तातडीने टाळली पाहिजे.










