Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (अजित पवार गट) सध्या अंतर्गत धुसफूस आणि विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर अखेर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. आमच्या पक्षात कोणताही गैरसमज किंवा अविश्वासाचे वातावरण नाही, असे सांगत त्यांनी सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमची कोणतीही गुप्त भेट झालेली नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांकडून वाव उठवल्या जाणाऱ्या वृत्तांचे खंडन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सध्या माध्यमं आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चा पूर्णपणे तथ्यहीन आणि चुकीच्या आहेत, असा दावा त्यांनी केला.
विलीनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
राजकीय वर्तुळात सातत्याने रंगणाऱ्या पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना सुनील तटकरे यांनी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले की, “अजितदादा जिवंत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत काही प्राथमिक चर्चा निश्चितच झाल्या होत्या. मात्र, अजितदादांच्या अकाली निधनानंतर या सर्व विलीनीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.” त्यामुळे पक्ष स्वतंत्र अस्तित्व टिकवून पुढे वाटचाल करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर तीव्र आक्षेप घेत तटकरे म्हणाले, “मी एक खासदार आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळी होणारी भेट ही राजकीयच असते असे नाही. माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी मला मुख्यमंत्र्यांना वारंवार भेटावे लागते. ज्या वेळी निव्वळ राजकीय बैठका असतात, त्या वेळी सुनेत्रा पवार यांना त्याबाबतची इत्थंभूत माहिती दिली जाते.”
आपल्या राजकीय अनुभवाचा दाखला देत ते म्हणाले, “मी गेली ४० वर्षे सक्रिय राजकारणात आहे आणि मला राजशिष्टाचाराची (Protocol) उत्तम माहिती आहे. सुनेत्रा वहिनी आणि आमच्यात अतिशय चांगले ट्युनिंग आहे. आम्ही पक्षातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी आणि सर्व गोष्टी त्यांना विश्वासाने सांगतो.”
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक (Delimitation Bill) आणि एनडीए
संसदेतील घडामोडींवर प्रकाश टाकताना सुनील तटकरे यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत (Delimitation Bill 2026) पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “गेल्या अधिवेशनात जेव्हा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मांडण्यात आले, तेव्हा मी एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या नात्याने त्याला मतदान करून पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विधेयकाला पाठिंबा द्यावा की नाही, हा सर्वस्वी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्यही ऐकले आहे. मात्र, एखाद्या महत्त्वाच्या विधेयकाला किंवा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला समर्थन देणे म्हणजे आम्ही पूर्णपणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील झालो, असा राजकीय अर्थ काढणे अत्यंत चुकीचे आहे,” असे तटकरे यांनी ठामपणे सांगितले.
दिल्ली दौरा आणि पुढील रणनीती
याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत माहिती देताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, आगामी रविवारी मी स्वतः, पार्थ पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल दिल्ली दौऱ्यावर जाणार आहोत. या दिल्ली दौऱ्यात कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर महत्त्वाची चर्चा होणार आहे.









