Garry Sobers Passes Away: जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाणारे वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर गॅरी सोबर्स यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांचे सुपुत्र डॅनियल यांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 10 दिवसांनंतर ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते, परंतु त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
बार्बाडोस येथे जन्मलेल्या गॅरी सोबर्स यांनी सुमारे 2 दशकांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अष्टपैलू खेळाडू या संकल्पनेची व्याख्याच बदलून टाकली होती. 1954 ते 1974 या काळात त्यांनी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करताना फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर असे काही विक्रम प्रस्थापित केले, जे आजही क्रिकेट विश्वात आदराने चर्चिले जातात.
93 कसोटी सामने आणि 36 वर्षे टिकलेला तो जागतिक विक्रम
सर गॅरी सोबर्स यांच्या कसोटी कारकिर्दीतील आकडेवारी त्यांच्या महानतेची साक्ष देते:
- अफाट धावसंख्या: त्यांनी वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळताना 57.78 च्या नेत्रदीपक सरासरीने 8,032 धावा फटकावल्या. यामध्ये 26 शतकांचा समावेश आहे.
- ऐतिहासिक 365 धावा: त्यांनी 1958 मध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 365 धावांची खेळी केली होती. ही खेळी तब्बल 36 वर्षांपर्यंत कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जागतिक विक्रम म्हणून अबाधित होती.
- अष्टपैलू गोलंदाजी: डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करण्यासोबतच फिरकी गोलंदाजी करण्याच्या अद्भूत क्षमतेमुळे त्यांनी कसोटीत 235 बळी (विकेट्स) घेतले.
6 चेंडूंत 6 षटकार मारणारे जगातील पहिले फलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त सोबर्स यांचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दबदबाही तितकाच मोठा होता. 1968 मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून ग्लॅमॉर्गनविरुद्ध खेळताना त्यांनी एकाच षटकात 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात असा कारनामा करणारे ते जगातील पहिलेच फलंदाज ठरले होते. त्यांनी आपल्या संपूर्ण प्रथम श्रेणी कारकिर्दीत 28,000 पेक्षा जास्त धावा केल्या आणि 1,000 हून अधिक बळी घेण्याचा अनोखा टप्पा पार केला.
त्यांच्या या अतुलनीय क्रीडा सेवेसाठी 1975 मध्ये त्यांना ब्रिटन सरकारच्या वतीने ‘नाईटहूड’ (सर) पदवी बहाल करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यांच्या सन्मानार्थ वर्षातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटूला ‘सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी’ देण्याची परंपरा सुरू केली.
त्यांचा आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्येही समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जगभरातील आजी-माजी खेळाडू, क्रीडा संघटना आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून, क्रिकेटमधील एका महान पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली आहे.










