Home / देश-विदेश / Sonam Wangchuk : सोनम वांगचुकना फरफटत रुग्णालयात नेले ! अश्रू ढाळत दीपकेने आमरण उपोषण सुरू केले

Sonam Wangchuk : सोनम वांगचुकना फरफटत रुग्णालयात नेले ! अश्रू ढाळत दीपकेने आमरण उपोषण सुरू केले

Sonam Wangchuk : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागील 20 दिवसांपासून उपोषण करत असलेले लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA
Sonam Wangchuk : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागील 20 दिवसांपासून उपोषण करत असलेले लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज सकाळी 7 वाजता दिल्ली पोलिसांनी पोलिसी बळाचा वापर करून जंतरमंतरवरून उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. साध्या वेषात आलेले पोलीस डॉक्टर असल्याची बतावणी करत उपोषणस्थळी आले आणि वांगचुक यांचे दोन्ही हात आणि पाय पकडून त्यांना फरफटत घेऊन गेले. त्यावेळी वांगचुक समर्थकांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला.  वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेतानाचे दृश्य जगाला दिसू नये म्हणून पोलिसांनी पांढरे कापड आडोशासाठी धरले होते. ही दृश्य पाहून देशभरात संतापाची लाट उसळली. अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारच्या या दडपशाहीवर टीकेची झोड उठवली. वांगचुक यांच्यावरील या कारवाईने भावुक झालेले सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके याने उपोषणस्थळावरील वांगचुक यांच्या गादीवर त्यांची तसबीर ठेवून बाजूच्या गादीवर बसून स्वतः उपोषण सुरू केले. सोमवारी ते आणि वांगचुक यांची पत्नी गीतांजली मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.


28 जूनपासून दिल्लीत उपोषण करत असलेल्या वांगचुक यांची केंद्र व  दिल्ली सरकारने मागील 20 दिवस मुळीच दखल घेतली नव्हती. त्यामुळे केंद्र सरकारवर चहुबाजूंनी टीका होत होती. कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) पुकारलेल्या चलो संसद मोर्चाची तारीख तोंडावर येऊन ठेपली होती. शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी आपले प्राण पणाला लावलेल्या वांगचुक यांना देशभरातून पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे बिथरलेल्या केंद्र सरकारने वांगचुक यांचे उपोषण मोडून काढण्याचा प्रयत्न केला. वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात वांगचुक यांना भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांना पोलिसांनी त्यांची भेट घेऊ दिली नाही. त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्यात आला. वांगचुक यांचा वैद्यकीय अहवाल फक्त त्यांना बघू दिला. गीतांजली यांनी अहवालाची प्रत मागितली असता डॉक्टरांनी त्यांना प्रत देण्यास नकार दिला. यावर गीतांजली यांनी स्पष्ट केले की, रुग्णालयात वांगचुक यांचे उपोषण सुरूच आहे. डॉक्टर परवानगी न घेता त्यांना रक्तातून वा तोंडावाटे अन्न देऊ शकत नाही.


पोलीस आणि प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध करत अंगमो यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या परिसरात पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, मी वांगचुक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी मला रोखले.
माझ्या हातातील मोबाईलही काढून घेतला. रुग्णालयात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ते पाहून क्षणभर मला असे वाटले की, सफदरजंग हे रुग्णालय नसून कारागृह असावे. एवढे पोलीस कशासाठी, असा सवाल मी अधिकार्‍यांना विचारला. त्याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. मला विचारल्याशिवाय वांगचुक यांच्यावर कोणतेही उपचार करता येणार नाहीत, असे मी डॉक्टरांना बजावून सांगितले. तरीही डॉक्टरांनी त्यांना इलेक्ट्रॉल पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र वांगचुक यांनी इलेक्ट्रॉल पिण्यास नकार दिला. साध्या वैद्यकीय अहवालाची प्रत मला देण्यास नकार दिल्याने हा सगळा प्रकारच मला संशयास्पद वाटतो. लवकरच आम्ही त्यांना आमचा ज्या रुग्णालयावर विश्वास तिथे दाखल करणार आहोत, असे गीतांजली अंगमो यांनी सांगितले. येत्या सोमवारपर्यंत प्रशासनाने जर वांगचुक यांना डिस्चार्ज दिला नाही तर वांगचुक यांची प्रतिनिधी या नात्याने सोमवारच्या मोर्चाचे मी स्वतः नेतृत्व करीन अशी घोषणा अंगमो यांनी केली.


वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवल्यानंतर दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवेदन जारी केले.सोनम वांगचुक यांची प्रकृती ढासळत असल्याने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी काही जणांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडा गोंधळ झाला. जंतरमंतरवरील आंदोलकांनी आता मैदान रिकामे करावे, असे उपायुक्तांनी निवेदनात म्हटले.सकाळचा संपूर्ण घटनाक्रम माध्यमांसमोर सांगताना दीपके यांना रडू कोसळले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले की, गेले 20 दिवस उपोषण करीत असलेल्या साठ वर्षे वय असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ओढत, शिव्या देत उपोषणस्थळावरून नेले. मला मारहाण केली. तुम्हाला धडा शिकवतो, अशी धमकी पोलिसांनी मला दिली. दिल्ली पोलीस हे संघाचे गुंड आहेत, असा संताप दीपके याने व्यक्त केला.


काही वेळाने दीपके आपल्या समर्थकांशी संवाद साधत असताना गर्दीतून वाट काढत आलेल्या एका महिलेने त्याच्या चेहर्‍यावर शाई फेकली. त्यामुळे त्याचे समर्थक आक्रमक झाले. मात्र पोलिसांनी वेळीच संबंधित महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दीपके याने शाई फेकल्याबद्दल आक्रमक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, माझा रंगच निळा आहे, त्यामुळे निळी शाई फेकल्याबद्दल मी आनंदी आहे. जय भीम. त्यानंतर हे प्रकरण तिथेच शांत झाले.दरम्यान, वांगचुक यांना पोलिसांनी उचलून नेल्याचे वृत्त कळताच  शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, आदित्य ठाकरे आदि नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.


 वांगचुक यांच्या बाबतीत मागील 20 दिवस केंद्र सरकारची बघ्याची भूमिका होती. वांगचुक यांचे उपोषण दिल्लीतच सुरू असताना सरकारमधून कुणीही त्यांना भेटत नाही, हे योग्य नाही. वांगचुक यांना अटक केली तरी आता हे आंदोलन थांबणार नाही, असे शरद पवार म्हणाले. अण्णा हजारे यांनीही म्हटले की, सरकारने दीपके याच्याशी चर्चा करायला हवी.राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट करून मोदी सरकारवर बोचरी टीका केली. ‘असत्य आणि हिंसा’ ही  मोदी सरकारची मूळ तत्वे आहेत. जंतरमंतरवर अहिंसकपणे उपोषण करणार्‍या वांगचुक यांना अशा प्रकारे उचलून नेणे चुकीचे आहे. पेपरफुटी, महाग होत चाललेले शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने गंभीर मुद्दे आहेत. सरकारने कितीही प्रयत्न केला तरी आता विद्यार्थी मागे हटणार नाहीत आणि माझ्यासारख्या लोकांना विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आवाज उठवण्यापासून सरकार रोखू शकणार नाही, असे राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये लिहिले.


तर धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय आहे की, सरकार त्यांच्या चुकांवर पांघरूण घालत आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. नीट पेपरफुटीमुळे देशभरात 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.आता आणखी किती बळी हवे आहेत ते सरकारने एकदा जाहीर करून टाकावे, असे उपरोधिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप करत वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्यावर कोणते उपचार केले याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र युवा नेता अमित ठाकरे आज सकाळी दिल्लीत दाखल झाले. मात्र ते विमानतळावर उतरण्याआधीच पोलिसांनी वांगचुक यांना उपोषणस्थळावरून उचलले होते. त्यावर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना जळजळीत प्रतिक्रिया दिली.


आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीसाठी घातक दिवस ठरला आहे. लोकशाही आपल्या डोळ्यासमोर संपवली जात आहे.लोकशाही वाचवायची असेल तर हे आंदोलन आता देशभर पेटले पाहिजे, असे अमित ठाकरे म्हणाले. न्यायालयाने वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी घ्या, त्यांना आवश्यक ते उपचार द्या, असे निर्देश दिलेले असताना पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना उचलून नेले. त्यांना शिवीगाळ करत, ओढत, फरफटत न्या, असे न्यायालयाने आदेश दिले होते का, असा सवालही त्यांनी विचारला.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या