Home / शहर / Election commission:मतदारयादीतील घोळ तपासा! निवडणूक आयोगाचा आदेश

Election commission:मतदारयादीतील घोळ तपासा! निवडणूक आयोगाचा आदेश

Election commission- मतदारयादीतील अनियमिततेच्या मुद्यावरून विरोधकांच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात लागोपाठ दोन दिवस राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारल्यानंतर...

By: Team Navakal
Chockalingam

Election commission- मतदारयादीतील अनियमिततेच्या मुद्यावरून विरोधकांच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात लागोपाठ दोन दिवस राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आरोप झालेल्या मतदारसंघातील मतदारयाद्यांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ही चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आयोगाकडे (Election commission)सादर करावा, असे या आदेशात म्हटले आहे.


महाविकास आघाडीसह मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती, तेव्हा एकाच कुटुंबामध्ये अनेक नावे, बापाचे वय मुलापेक्षा कमी, एका घरात शेकडो मतदार अशा मतदारयाद्यांतील अनेक त्रुटी त्यांनी दाखवल्या होत्या. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आयोगाचे अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसले होते. या तक्रारी आणि आरोपांची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना मतदारयाद्यांतील त्रुटींची चौकशी करून अहवाल सादर करायला सांगितला आहे. यात एकाच मतदारसंघात एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी नोंदले गेले आहे का याचीही तपासणी केली जाणार आहे. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. दिवाळीमुळे हा अहवाल पुढील आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो विरोधी पक्षाच्या नेत्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.


यावरून शिंदे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, याचा अर्थ निवडणूक आयोग पारदर्शक आहे. तुम्ही आरोप करत असाल तर पुरावे द्या. त्यावर योग्य ती कारवाई होईल. मतदारयाद्यांतील त्रुटी ही जुनी समस्या आहे. बिहारमध्येदेखील अशाच प्रकारच्या त्रुटी होत्या. त्याला राजकीय रंग देणे योग्य नाही. काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होते तेव्हादेखील मतदारयादीत गफलती होत्या. मग त्याबद्दल कोणाला जबाबदार धरायचे? महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना जबाबदार धरायचे का?
विशेष म्हणजे, विरोधकच नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे आमदारही मतदारयाद्यांवर आक्षेप घेत थेट निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आहेत. त्यात राष्ट्रवादीचे छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, बेलापूरच्या भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे आणि बुलडाण्याचे शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा समावेश आहे. आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36 हजार बोगस नावे आढळली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी ही 36,000 नावे समाविष्ट झाल्याचे आढळले आहे. मौजे रांजणगाव शेणपुंजीसारख्या अस्तित्वात नसलेल्या भागातील ही नावे आहेत. एका घराच्या पत्त्यावर 171 मतदार दाखवले आहेत ज्यांची नावे, लिंग आणि वय समान आहे.


आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की, मी 15-20 वर्षे मतदारयादीबाबत तक्रार करत आहे. काही ठराविक लोक पैसे घेऊन नोंदणी करतात. लोकांना गावावरून आणले जाते आणि मतदान करण्यास सांगितले जाते. याचा फटका उमेदवाराला बसतो. आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले की निवडणुकीच्या तीन दिवस आधी बुलडाणा शहराच्या मतदारयादीत किमान 4 हजार मतदारांची दुबार नावे, मृत मतदारांची नावे, बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची नावे कायम असल्याची तक्रार केली होती. त्यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला की, ही दुबार नावे काढली का जात नाहीत? कोणता कायदा किंवा संविधान असेल की ज्यानुसार बोगस नावे कायम ठेवली जातात? बुलडाणा जिल्ह्यात एक लाखाच्या घरात अशी दुबार नावे असू शकतील. मतदाराच्या मृत्यूनंतर 13 वर्षे उलटूनही लोकांची नावे मतदार यादीत कायम आहेत.


हे देखील वाचा – 

पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून ठिय्या..

ठाणे पालिकेत ठाकरे बंधूंची अबकी बार ७५ पारची घोषणा

 ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चे निर्माते मांजरेकरांविरुद्ध दावा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या