Kasturba Hospital– मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील( Kasturba Hospital) निवृत्त कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी सहकाऱ्यांना दिलेल्या प्रबोधनकार ठाकरे लिखित पुस्तकामुळे वाद निर्माण झाला. ही पुस्तके वाटल्याबद्दत महिला कर्मचाऱ्यांनी कदम यांना जाब विचारत माफी मागण्यास भाग पाडले. त्यांच्यावर पुस्तके फेकली. याप्रकरणी कदम यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर कदम यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर वाद घालणार्या महिलांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा महिलांनीच काढलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
राजेंद्र कदम (५८) हे कस्तुरबा रुग्णालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते ३० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांनी २८ ऑगस्ट रोजी सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले देव आणि देवळांचा धर्म आणि दिनकरराव जवळकर यांचे देशाचे दुश्मन या पुस्तकांचे वाटप केले. मात्र त्यामुळे वाद निर्माण झाला.
रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविकेने २९ ऑगस्ट रोजी कदम यांना कक्षात बोलावले. त्याठिकाणी महिला परिचारिका आणि महिला कर्मचारी उपस्थित होत्या. या पुस्तकांमुळे आमच्या भावना दुखावल्या. कदम यांनी हे पुस्तक का वाटले? कदम यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर कदम यांनी स्पष्टीकरण दिले की, माझा हेतू धर्माच्या भावना दुखावण्याचा नव्हता. तर परिवर्तनवादी विचार रुजावण्याचा होता. मात्र महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कदम यांनी हात जोडून माफी मागितली. परंतु त्यांनतरही त्यांच्या अंगावर प्रबोधनकारांची पुस्तके फेकली.
राजेंद्र कदम यांनी तक्रारीत म्हटले की, मला अचानक कक्षात बोलावले आणि महिलांनी जाब विचारला. ज्यांच्या सोबत अनेक वर्ष काम केले त्या महिला माझ्याविरोधात आक्रमक झाल्या होत्या. या महिलांनी माझ्याशी अर्वाच्च भाषेत बोलत अपमान केला. त्यानंतर त्यांनी ३० सप्टेंबर रोजी झालेला सेवानिवृत्तीच्या सोहळ्यावरही बहिष्कार टाकला. महिलांनी २८ ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रकाराची चित्रफित तयार केली होती. ती व्हायरल केली. यामुळे मी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु रुग्णालयाने या महिलांवर ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार करणे भाग पडले.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
महाराष्ट्राने सविस्तर अहवाल पाठवावा; मोदी सरकार तत्काळ मदत करतील ! अमित शहांचे आश्वासन
रिया चक्रवर्तीला 5 वर्षांनी परत मिळाला पासपोर्ट; भावनिक पोस्ट करत म्हणाली…