Harsha bhogle- कबुतरखाना आणि कबुतरांना दाणा हे विषय पुन्हा एकदा पटलावर आले आहेत. एकीकडे जैन समुदायाने कबुतरांसाठी दंड थोपटत निवडणूक लढण्याची घोषणा केली तर दुसरीकडे हर्षा भोगले, (Harsha bhogle) अंजली दमानिया आणि आम्ही गिरगावकर यांनी कबुतरांना खायला घालू नका, असे आवाहन आज केले आहे.
जैन समुदायाने दादरमध्ये काल मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सभा घेतली होती. यावेळी जैनमुनी कैवल्य रत्न महाराज यांनी कबुतरांमुळे आजार होतात असे सांगणार्या डॉक्टरांना मूर्ख म्हटले. मात्र दिल्लीत प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी पुण्यातील एका माजी नगरसेवकाच्या मुलीचा कबुतरांच्या विष्ठेमुळे झालेल्या फुफ्फुसांच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची बातमी वाचली. त्यानंतर त्यांनी एक्स पोस्टवर म्हटले की डॉक्टर आपल्याला या आजाराबद्दल ओरडून सांगत आहेत. आपण कबुतरांना खायला देणे थांबवूया. त्याचवेळी मुंबईतील ‘आम्ही गिरगांवकर’ या संघटनेने ‘कबुतर गो बॅक टू मारवाड राजस्थान’ अशी पोस्टर लावून आणि पोस्ट करत जैन समाजाच्या मागण्यांचा तीव्र विरोध केला आहे.
हर्षा भोगले यांना दिल्लीत मैदानात 12 ऑगस्टचा पेपर हाती लागला. त्यात एक पुण्यातील माजी नगरसेवक शाम मानकर यांची मुलगी शीतल विजय शिंदे यांचा कबुतराच्या विष्ठेमुळे फुफ्फुसातील फायब्रोसिस हा आजार झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते. भोगले यांनी बातमीवर पोस्ट करीत म्हटले की, दिल्लीत मी मैदानावर जाताना लोक कबुतरांना खायला घालताना पाहून माझे हृदय पिळवटून गेले. कबुतरांची विष्ठा श्वास घेण्याच्या धोक्यांबद्दल आणि त्यामुळे होऊ शकणार्या गंभीर फुफ्फुसांच्या आजारांबद्दल डॉक्टर ओरडून सांगत आहेत. कृपया, आपण कबुतरांना खायला देणे थांबवूया.
काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याला जैन समाजाने निदर्शने करून विरोध केला. दादरमध्ये रस्ता रोखून धरण्यात आला आणि ताडपत्री फाडली गेली. त्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन करत, प्रत्येक वॉर्डमध्ये कबुतरखाने उभारले जातील, अशी घोषणा केली. ज्यामुळे वाद अजून तीव्र झाला आहे. काल जैन समाजाने शांतीदूत जनकल्याण पार्टी नावाचा नवीन राजकीय पक्ष घोषित केला. ज्याचे चिन्ह कबुतर असणार आहे. यावर आज प्रतिक्रिया देत मुंबईच्या आम्ही गिरगावकर संघटनेने म्हटले की, शांतीदूताच्या कबुतरांना आता त्याच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी माणसाला करावीच लागेल. आम्ही गिरगावकर संघटनेचे गौरव सागवेकर म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. या कबुतरांमुळे आरोग्याला धोका निर्माण होणार आहे.
त्यांना कबुतरखान्यासाठी परवानगी दिली गेली तर आम्ही त्याच्या बाजूला चिकन-मटणचे दुकान सुरू करू. तुम्ही मारवाडला परत जा. तुमचा राजस्थान आमच्या महाराष्ट्रापेक्षा मागास आहे. तुमची आमच्या राज्यात गरज नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुण्यात म्हणाल्या की, वैज्ञानिकदृष्ट्या बघितले तर कबुतरामुळे छातीचा संसर्ग, विषाणू संसर्ग, बुरशी संसर्ग होऊन फुफ्फुसांना इजा होते. यासाठी मी जैन डॉक्टरांना आवाहन केले होते की, तुम्ही तुमच्या धर्मगुरूना समजावून सांगा, पण त्यातही राजकारण होते. हत्तींबाबतही राजकारण होते. याच क्षुल्लक गोष्टींवर राजकारण होते. मात्र राज्यावर सव्वानऊ लाख कोटींचे कर्ज आहे. त्यावर कुणी बोलत नाही. कारण आपले अर्थमंत्री दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांना काहीच कळत नाही. हे कर्ज कसे कमी करणार याकडे त्यांचे लक्ष नाही किंवा त्यांना ते
कळत नसेल.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा ––
ट्रम्प व भुसेंचे घनिष्ट संबंध गिरीश महाजनांचा टोला!
माहीम किल्ल्याचे पुनरुज्जीवन!अखेर सीमांकन प्रक्रिया पूर्ण