मुंबई – मुंबई महापालिकेच्या कूपर, कस्तुरबा आणि क्षयरोग रुग्णालयासह उपनगरांतील रुग्णालयात कार्यरत परिचारिकांना आता महिन्याला सहा ऐवजी आठ सुट्ट्या मिळणार आहेत. उपायुक्त शरद उघडे यांच्यासोबत झालेल्या परिचारिकांच्या चार संघटनांच्या बैठकीमध्ये या सर्व परिचारिकांना ८ सुट्ट्या लागू करण्याबाबत उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. याबाबत काही बैठका झाल्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पालिकेच्या केईएम,शीव व नायर रुग्णालयातील परिचारिकांना महिन्याला ८ सुट्ट्या मिळत आहेत.मात्र कूपर, कस्तुरबा आणि क्षयरोग रुग्णालयासह उपनगरांतील रुग्णालयाच्या परिचारिकांना ६ दिवस सुट्ट्या मिळत आहेत.
प्रशासनाकडून अशी सापत्न वागणूक मिळत असल्याने परिचारिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते.या पार्श्वभूमीवर परिचारिकांच्या चार संघटनांची नुकतीच उपायुक्त शरद उघडे यांच्यासोबत एक बैठक पार पडली.त्यामध्ये या सर्व परिचारिकांना ८ सुट्ट्या लागू करण्याबाबत उपायुक्त उघडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. याबाबत काही बैठका झाल्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल,असे आश्वासनही त्यांनी दिले.त्यामुळे मुंबई पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या जवळपास साडेतीन हजार परिचारिकांना ८ दिवस सुट्ट्या मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.या बैठकीत महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने परिचारिकांचे काही मुद्दे मांडले.









