Pune News: यंदाच्या दिवाळी (Diwali 2025) सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात फटाक्यांची विक्री आणि ते वाजवण्यासंबंधी पुणे पोलीस आयुक्तालयाने अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत.
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषणटाळण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य आणि शांतता जपण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे निर्बंध तातडीने लागू करण्यात आले आहेत.
पुणेकरांसाठी फटाके वाजवण्याची वेळ आणि नियमावली
पुण्यातील नागरिकांना दिवाळी दरम्यान फटाके वाजवण्यासाठी विशिष्ट वेळेचे आणि जागेचे बंधन पाळावे लागणार आहे.
- वेळेची मर्यादा: पुणे शहरात रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत ध्वनी निर्माण करणारे फटाके वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
- अपवाद: आवाज न करता फक्त रंग निर्माण करणारे फटाके, जसे की फुलबाजी आणि अनार, हे वरील वेळेनंतरही वाजवण्यास मुभा असेल.
- अॅटमबॉम्बवर बंदी: ‘अॅटमबॉम्ब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट स्फोटक फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि जवळ बाळगणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
- साखळी फटाक्यांवर नियंत्रण: 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे.
- आवाजाची मर्यादा: फटाका उडवण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी आहे. साखळी फटाक्यांसाठी ही आवाजाची मर्यादा 105 ते 115 डेसिबल पर्यंत असावी.
शांतता क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी निर्बंध
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आवश्यक सेवांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी काही ठिकाणी फटाके वाजवण्यास सक्त मनाई आहे.
- शांतता क्षेत्र (Silent Zone): रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरापासून 100 मीटरच्या आत कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. या परिसरांना शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- इतर बंदी क्षेत्र: कोणत्याही रस्त्यावर, पुलावर, घाट किंवा सेतूजवळ फटाके उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, रस्त्यापासून 10 मीटर अंतराच्या आत फटाके फोडणे, फेकणे किंवा अग्निबाण (Rockets) उडवण्यासही सक्त मनाई आहे.
फटाके विक्रेत्यांसाठी कडक नियमावली आणि कारवाईचा इशारा
या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
विक्री परवाना: पुणे शहरात 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीतच तात्पुरते विक्री परवाने वैध राहतील.
कारवाई: पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना या नियमांचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा – रशियाकडून लढणारा गुजरातमधील 22 वर्षीय भारतीय तरुण युक्रेनच्या ताब्यात; व्हिडिओ व्हायरल